चिंचोली येथे केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आयुष्मान भारत इन्फ्रास्ट्रकचर या योजनेतून मंजूर ५० खाटांच्या क्रिटिकल केअर इमारत मंजूर

चिंचोली येथे केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आयुष्मान भारत इन्फ्रास्ट्रकचर या योजनेतून मंजूर ५० खाटांच्या क्रिटिकल केअर इमारत मंजूर
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते क्रिटिकल केअर इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन
▪️शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नव्या इमारतीची केली पाहणी
जळगाव (प्रतिनिधी) – चिंचोली येथे उभारण्यात येत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या संकुलात, केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आयुष्मान भारत इन्फ्रास्ट्रकचर या योजनेतून मंजूर ५० खाटांच्या क्रिटिकल केअर युनिट इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन आज जलसंपदा मंत्री श्री. गिरीश महाजन यांच्या हस्ते पार पडले.
या प्रसंगी जळगावच्या लोकसभा खासदार सौ. स्मिता वाघ, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांच्यासह वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
*उत्कृष्ट आरोग्यसेवेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल*
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आयुष्मान भारत इन्फ्रास्ट्रकचर योजनेअंतर्गत मंजूर असलेल्या या क्रिटिकल केअर युनिटसाठी स्वतंत्र इमारत उभारण्यात येत असून, यामध्ये ५० खाटांची उच्चस्तरीय उपचार सुविधा असणार आहे. हे युनिट भविष्यातील आपत्कालीन परिस्थितींसह गंभीर रुग्णांच्या उपचारासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हा ६५० खाटांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, या नवीन युनिटमुळे एकूण खाटांची संख्या वाढून ७०० वर जाणार आहे. जिल्ह्यातील वैद्यकीय शिक्षण व उपचार सुविधा यामार्फत आणखी सक्षम होणार आहे.
या कार्यक्रमानंतर जलसंपदा मंत्री श्री. गिरीश महाजन यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकाम प्रगतीची पाहणी केली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाच्या टप्प्यांची माहिती घेतली व कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
मंत्री महाजन म्हणाले, “या प्रकल्पामुळे ग्रामीण व शहरी भागातील रुग्णांना अत्याधुनिक आरोग्यसेवा मिळणार असून, हा प्रकल्प जळगावच्या आरोग्य क्षेत्रातील एक मोठा टप्पा ठरणार आहे.”
—
