इतर

गुरुपौर्णिमा निमित्त जळगाव जिल्हा पोलिस दलातर्फे गुरु सन्मान सोहळा संपन्न

जळगाव,  डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव यांच्या संकल्पनेतून गुरुपौर्णिमा निमित्त जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुरूजनांचा सन्मान सोहळा पद्मालय हॉल, पोलीस मुख्यालय, जळगाव येथे उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील शिक्षक, शिक्षकेत्तर मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि नव्या पिढीला मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले होते.
प्रास्ताविक अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणात गुन्हेगारी प्रतिबंध, कायदा-सुव्यवस्था राखणे आणि तरुणांना गुन्हेगारी प्रवृत्तीकडून परावृत्त करण्यासाठी पोलीस व गुरु यांची संयुक्त भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले.

कार्यक्रमात डॉ. महेश्वर रेड्डी यांनी महिलांची सुरक्षितता, सायबर गुन्हेगारी, वाहतूक सुरक्षितता आणि अमली पदार्थांपासून तरुणांना दूर ठेवण्यासाठी पोलिसांच्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. त्यांनी गुरूजवळून नैतिक मूल्यांचे संस्कार विद्यार्थी आणि तरुणांवर होण्याचे महत्त्व विशद केले.

चर्चासत्रात यजुर्वेद्र महाजन यांनी डिजिटल माध्यमातून जनजागृती करण्याच्या गरजेवर भर दिला, तर प्रणाली सिसोदीया यांनी बेरोजगार तरुणांना मोफत शिक्षण देत पोलिसांबरोबर संयुक्त सत्रे घेत गुन्हेगारी पासून दूर ठेवण्याचा उपाय सुचवला. गोकुळ महाजन यांनी “पोलीस काका व पोलीस दिदी” उपक्रम पुन्हा सुरू करून विद्यार्थ्यांत नैतिक मूल्ये बिंबवण्याचा प्रस्ताव मांडला.

या वेळी सन्मानित करण्यात आलेल्या मान्यवरांमध्ये गणपतराव पौळ, डॉ. अनिल डोंगरे, डॉ. गयाज उस्तानी, डॉ. अपर्णा भट, आरती गोरे, डॉ. यशवंत पाटील, डॉ. इरफान शेख, सिस्टर मार्टल बेंजामीन, प्रा. मिनाक्षी पाटील, अविनाश जावळे, डॉ. नितीन विसपुते, पो. ना. रज्जाक अली सय्यद यांसह एकूण ५० हून अधिक गुरूजनांचा समावेश होता.

या कार्यक्रमास डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यासह अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक; संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी; अरुण आव्हाड, पोलीस उपअधीक्षक (गृह); राखीव पोलीस निरीक्षक प्रशांत सुगरवार व जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित माळी यांनी तर आभारप्रदर्शन संदीप गावीत यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन पो. उपनिरीक्षक रेश्मा अवतारे व मानव संसाधन विभाग, जळगाव यांनी डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button