इतर

भाजपला धक्का : सोशल मीडिया जिल्हाध्यक्षांसह अनेक कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश

भाजपला धक्का : सोशल मीडिया जिल्हाध्यक्षांसह अनेक कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश

जळगाव (प्रतिनिधी) – भाजपमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत असंतोषाला आता उघड रूप येत असून, पक्षातील स्थानिक पातळीवरील वर्चस्ववाद आणि पदाधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप सोशल मीडिया आघाडीचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, वसंतवाडीचे सरपंच विनोद पाटील, ग्रामपंचायत सदस्य सागर ठोसरे आणि सोपान सूर्यवंशी यांनी थेट शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करत भाजपला मोठा धक्का दिला आहे.

या सर्व कार्यकर्त्यांनी राज्याचे पाणीपुरवठा आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. या प्रवेशामुळे आगामी स्थानिक आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये अस्वस्थता वाढण्याची शक्यता आहे.

या संदर्भात दीपक पाटील यांनी सांगितले की, “भाजपमध्ये आम्ही अनेक वर्षे निष्ठेने काम केले. मात्र, अलीकडच्या काळात पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी निष्ठावान कार्यकर्त्यांना दुर्लक्षित करणे सुरू केले आहे. आम्हाला निर्णय प्रक्रियेतून दूर ठेवले जात होते. त्यामुळे आम्ही पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला.”

दरम्यान, भाजपसाठी हा प्रकार अंतर्गत संघटनात्मक गटबाजीचे गंभीर संकेत मानले जात असून, निवडणुकांपूर्वी कार्यकर्त्यांची होणारी ही पडझड पक्षासाठी मोठ्या चिंतेचा विषय बनत आहे. शिंदे गटात दाखल झालेल्या या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून स्थानिक पातळीवरही शिंदेसेनेला नवसंजीवनी मिळण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button