अरे देवा … ! जळगाव शहरात चड्डी गँगचा थरार ! ; एका रात्रीत तीन मंदिरे आणि एका घरात चोरी; चांदीच्या पादुका, मूर्ती, दानपेटी लंपास

अरे देवा … ! जळगाव शहरात चड्डी गँगचा थरार ! ; एका रात्रीत तीन मंदिरे आणि एका घरात चोरी; चांदीच्या पादुका, मूर्ती, दानपेटी लंपास
जळगाव (प्रतिनिधी) – शहरात चड्डीवर आलेल्या चोरट्यांनी धुमाकूळ घालत एका रात्रीत तीन मंदिरांमधून आणि एका बंद घरातून चोरी केल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली आहे. केवळ चड्डीवर आलेल्या या चोरटयांनी शस्त्रांसह धुमाकूळ घातल्याने शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
रायसोनी नगर परिसरात चोरट्यांनी रविवारी मध्यरात्री दोन मंदिरांमध्ये घुसून चांदीच्या पादुका, मूर्ती व दानपेटीतील रोकड लंपास केली. तर तिसऱ्या मंदिरात हाती काही न लागल्याने पेन ड्राईव्ह चोरून नेली. याच दरम्यान परिसरातील एका बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी करण्यात आली. ही घटना ३ ऑगस्ट रविवारी रोजी पहाटे अडीचच्या सुमारास घडली.
श्री गजानन महाराज मंदिर, शिवनेरी नर्मदेश्वर महादेव मंदिर आणि एका अन्य मंदिराला चोरट्यांनी लक्ष्य केले. गजानन मंदिराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी सुमारे ७०० ग्रॅम वजनाच्या चांदीच्या पादुका, दीड फूट उंचीची धातूची गणेशमूर्ती व दानपेटीतील रोकड चोरून नेली. संबंधित दानपेटी अनेक दिवसांपासून न उघडल्याने त्यामधील रकमेचा अंदाज लावता आलेला नाही.
शिवनेरी नर्मदेश्वर मंदिरात काही महिन्यांपूर्वी देखील चोरी झाली होती. त्यामुळे तेथे दानपेटी ठेवली जात नव्हती. मात्र, या वेळी चोरट्यांनी मंदिरातील अन्य मौल्यवान वस्तूंवर हात साफ केला.
दरम्यान, इंदिरा सहकारी वसाहतीजवळील मोहाडी रोडवरील केतन सुरेश चौधरी यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील ऐवज चोरी केला. चौधरी कुटुंबीय बाहेरगावी गेल्याची माहिती मिळताच चोरट्यांनी ही संधी साधली.
परप्रांतीय ‘चड्डी गँग’ चा संशय; सीसीटीव्हीत चोरटे कैद
चोरीच्या घटनेनंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असून त्यात चार संशयित चोरटे दिसून आले आहेत. चड्डी आणि बनियन परिधान केलेले हे चोरटे रस्त्याने फिरत असल्याचे आणि हातात शस्त्र घेतल्याचे फुटेजमधून स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, गजानन मंदिराजवळ राहणाऱ्या एका व्यक्तीने पहाटे मंदिराजवळ चार संशयितांना फिरताना पाहिले. त्यांनी आरडाओरड करताच चोरटे घटनास्थळावरून पळून गेले.





