वनविभागात लाचखोरीचा पर्दाफाश: पारोळा येथील अधिकाऱ्यासह ३ जण एसीबीच्या जाळ्यात

खान्देश टाइम्स न्यूज l ०५ ऑगस्ट २०२५ l जळगाव l वृक्ष लागवड योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी ३६ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या वनविभागातील तीन कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. या कारवाईमुळे वनविभागातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
जळगाव येथील एका शेतकऱ्याला आणि त्यांच्या तीन नातेवाईकांना शेतात बांबूची लागवड करायची होती. त्यासाठी त्यांनी अमृत महोत्सवी फळझाड, वृक्ष लागवड योजनेअंतर्गत सामाजिक वनीकरण विभाग, अमळनेर यांच्याकडे अर्ज केले होते. या विभागाचा अतिरिक्त कार्यभार पाहणारे पारोळा येथील वन परिक्षेत्र अधिकारी मनोज बबनराव कापुरे यांनी प्रत्येक फाईल मंजूर करण्यासाठी १० हजार रुपये, असे एकूण ४० हजार रुपयांची लाच मागितली.
शेतकऱ्याला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता, वनअधिकारी मनोज कापुरे आणि लिपिक निलेश चांदणे यांनी तडजोडीअंती ३६ हजार रुपयांची लाच स्वीकारण्यास सहमती दर्शवली.
यापैकी ३५ हजार रुपये कापुरे यांनी स्वतःसाठी, तर १ हजार रुपये लिपिक चांदणे यांच्यासाठी मागितले होते. ही रक्कम कंत्राटी चालक कैलास भरत पाटील यांच्याकडे देण्यास सांगितले होते.
एसीबीच्या पथकाने सापळा रचून कंत्राटी चालक कैलास पाटील याला ३६ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. त्यानंतर वन परिक्षेत्र अधिकारी मनोज कापुरे आणि लिपिक निलेश चांदणे यांनाही ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस उप अधीक्षक योगेश ठाकूर आणि निरीक्षक हेमंत नागरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.





