खान्देशगुन्हेजळगांव

जळगाव – मोबाईलवरील गाणे बंद केल्याच्या रागातून बापाकडून पत्नी व मुलीवर हल्ला

जळगाव – मोबाईलवरील गाणे बंद केल्याच्या रागातून बापाकडून पत्नी व मुलीवर हल्ला

जळगाव शहरातील चंदू अण्णा नगर परिसरात शुक्रवारी सकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली. मद्यप्राशन करून घरी परतलेल्या समाधान विजयसिंग पाटील (वय ३२) याने क्षुल्लक कारणावरून पत्नी व अकरावीत शिकणाऱ्या मुलीला गंभीर स्वरूपाची मारहाण केली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात समाधान पाटीलविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, समाधान पाटील हा १५ ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता दारूच्या नशेत घरी आला. त्याने पत्नीच्या मोबाईलवर गाणे सुरू केले. त्यावेळी मुलगी प्राप्ती पाटील अभ्यास करत होती. तिने वडिलांना गाणे बंद करण्यास सांगितले, मात्र त्यांनी दुर्लक्ष केल्याने प्राप्तीने स्वतःच मोबाईलवरील गाणे बंद केले. याचा राग मनात धरून समाधानने पत्नी जागृती पाटील हिला काचेचा ग्लास फोडून जखमी केले.

आईला वाचविण्यास मुलगी पुढे आली असता, आरोपीने कुकरच्या झाकणाने तिच्या हातावर मारहाण करून तिलाही जखमी केले. घटनेनंतर समाधान पाटील आपल्या मूळ गावी कल्याणेहोळ येथे पळून गेला. तिथे त्याने आपल्या आई-वडिलांकडे पत्नी व मुलीचा खून करण्याची धमकी दिल्याचे समजते.

जखमी जागृती पाटील यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button