
विद्यार्थी स्कुल व्हॅन नियमावली अंतिम करून अधिसूचना जारी करावी -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई : विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूकीसह रोजगाराच्या संधीसाठी परिवहन विभागाकडून स्कूल व्हॅन नियमावली आणण्यात येत आहे. ही नियमावली अंतिम करून याबाबत तातडीने अधिसूचना जारी करावी, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.
परिवहन आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत स्कूल व्हॅन बाबत सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी परिवहन मंत्री बोलत होते. बैठकीस परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, सहसचिव राजेंद्र होळकर, अपर परिवहन आयुक्त भरत कळसकार, सह परिवहन आयुक्त जयंत पाटील आदी उपस्थित होते. सेवानिवृत्त अतिरिक्त परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील यांनी सादरीकरण केले.
यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, अत्याधुनिक सुरक्षा व सुविधांनी युक्त असलेली अधिकृत स्कूल व्हॅन विद्यार्थ्यांना उपलब्ध होण्यासाठी आधीच्या नियमात बदल करण्यात येऊन नियमावली सुटसुटीत करावी. स्कूल व्हॅनचे भाडे मासिक तत्वावर आणि वर्षाच्या १० महिने कालावधीपर्यंतच घेण्याबाबत बंधन असावे. नियमावलीमध्ये परिवहन समित्यांचे सक्षमीकरण, महिन्यातून एकदा समितीची बैठक होणे, प्रत्येक शाळेने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी नोडल अधिकारी नेमणे अंतर्भूत असावे.
देशात सुरक्षित विद्यार्थी वाहतूकीसाठी केंद्र सरकारने स्कूल बस नियमावलीचा (ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री स्टँडर्ड्स अर्थात एआयएस-०६३) आधार घेऊन अद्यावत मानके अर्थात स्कूल व्हॅन नियमावली (एआयएस-२०४ ) तयार केली आहे. चारचाकी १२+१ आसनापर्यँत विद्यार्थी वाहतूक करण्यासाठी वाहनाला शालेय व्हॅनचा दर्जा देण्यात येणार आहे. वाहने BS-VI या श्रेणीतील असतील.





