भडगाव ;- भारतीय जनता पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी आज गोंडगाव येथील पिडीत कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करून मदतीचा धनादेशही दिला . यावेळी चित्र वाघ यांनी विशेष सरकारी वकील ॲड. उज्वल निकम संपर्क साधून त्यांना चिमुकलीच्या हत्या प्रकरणी खटला चालविणेबाबत विचारले असता त्यांनीही आपली तयारी दर्शविली.
याप्रसंगी चित्रा वाघ सोबत आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. चित्राताई वाघ यांनी या कुटुंबाशी संवाद साधून त्यांच्या कडून माहिती जाणून घेतली. यात हा नराधम यांचाच शेजारी असून त्यांच्या कुटुंबाशी कोणतेही वाद नव्हते. मात्र या नराधमाने भयंकर कृत्य करून या बालिकेची क्रूर हत्या केली अशी माहिती त्यांना सांगण्यात आली. याप्रसंगी आम्हाला न्याय हवा आणि या प्रकरणात विशेष सरकारी वकील ॲड. उज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
यानंतर चित्राताई वाघ यांनी ॲड. उज्वल निकम यांना मोबाईलवरून संपर्क साधला. याप्रसंगीॲड. उज्वल निकम यांनी आपण हा खटला चालवण्यासाठी तयार असल्याचे सांगितले. यावर चित्रा वाघ यांनी कायदेशीर बाबींची तात्काळ पूर्तता करून ॲड. उज्वल निकम हे गोंडगाव येथील बालिकेचा खटला चालविणार असल्याचे सांगितले. चित्राताई वाघ यांनी पिडीत कुटुंबीयांची विचारपूस करून भारतीय जनता पक्षातर्फे सदर कुटुंबाला मदतीचा धनादेश देखील प्रदान केला.