
गोदावरी संस्थेच्या आधारवड श्रीमती गोदावरी पाटील यांना श्रद्धांजली
जळगाव – गोदावरी फाउंडेशनच्या आधारवड, श्रीमती गोदावरी पाटील यांचे ३ सप्टेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संस्थेवर शोककळा पसरली असून, गोदावरीच्या विविध शैक्षणिक व वैद्यकीय संस्थांमध्ये शोकसभा आयोजित करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉ. केतकी पाटील सभागृहात शोकसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी वैद्यकीय संचालक डॉ. एन. एस. आर्विकर, अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके आणि प्रशासन अधिकारी प्रमोद भिरुड यांच्यासह प्राध्यापक, डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते. डॉ. आर्विकर यांनी गोदावरी पाटील यांच्या कार्याचा गौरव केला, तर डॉ. सोळंके यांनी वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा उल्लेख केला. त्यांच्यासोबत अनेक वर्षे काम केलेल्या प्रमोद भिरुड यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. उपस्थित सर्वांनी श्रद्धांजली अर्पण करून दोन मिनिटे मौन पाळले.
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालय
येथे आयोजित शोक सभेत प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी आपल्या मनोगतातून गोदावरी पाटील यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर प्रकाश टाकला. त्यांच्या योगदानाला आदराने वंदन करत सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी पुष्प अर्पण करून कृतज्ञता व्यक्त केली.
डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी
या महाविद्यालयात प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर यांच्या उपस्थितीत शोकसभा पार पडली. यावेळी सर्व शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी दोन मिनिटे मौन पाळून गोदावरी पाटील यांना आदरांजली वाहिली.
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद कॉलेज हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर
या महाविद्यालयात डीन डॉ. हर्षल बोरोले यांच्यासह सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. मान्यवरांनी गोदावरी पाटील यांच्या सामाजिक कार्याची आणि योगदानाची आठवण करून दिली. सर्वांनी दोन मिनिटे शांत उभे राहून त्यांना आदराने श्रद्धांजली वाहिली.





