
बिलवाडी येथे दोन गटात तुफान हाणामारीत एकाचा मृत्यू
दोन्ही गटातील १२ जण गंभीर जखमी
जळगाव (प्रतिनिधी) – बिलवाडी येथे दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत एकनाथ निया महाजन (वय ५५, रा. चिलवाडी) यांचा मृत्यू झाला असून दोन्ही गटातील १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, दुचाकीवरून जाताना मुलीकडे पाहिल्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद सुरू होता. शनिवारी रात्री हा वाद मिटल्याचे दिसून आले, मात्र रविवारी दुपारी तो पुन्हा पेटला. एकनाथ महाजन बकऱ्या चारून घरी जात असताना पाटील कुटुंबातील व्यक्तीशी त्यांचा पुन्हा वाद झाला. त्यातून दोन्ही गटांनी एकमेकांवर दांडके, पावड्या व लाकडी वस्तूंनी हल्ला केला. यात महाजन यांना जबर मारहाण झाली आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या हाणामारीत किरण पाटील, मीराबाई पाटील, ज्ञानेश्वर पाटील, दीपक पाटील, संगीता पाटील, कमलेश पाटील, जनाबाई गोपाळ, ज्ञानेश्वर गोपाळ, समाधान गोपाळ, गणेश गोपाळ, गौरव गोपाळ व भीमराव गोपाळ असे १२ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, जखमींना दाखल केल्यानंतर रुग्णालयात दोन्ही गट पुन्हा आमनेसामने आले. शिवीगाळ, धक्काबुक्की व हाणामारीचा प्रकार घडल्याने पोलिसांना तगडा बंदोबस्त तैनात करावा लागला. मृत्यूची बातमी समजताच रुग्णालयात नातेवाईक व महिलांनी आक्रोश केला. पोलिसांनी चॅनल गेट बंद ठेवून गर्दीला आत शिरण्यापासून रोखले.
या घटनेला राजकीय वादाची किनार असल्याची चर्चा असून गेल्या दहा वर्षांपासून दोन्ही कुटुंबांत वाद सुरू असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. संतप्त गोपाळ कुटुंबीयांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली असून कारवाई होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली आहे.
सध्या बिलवाडी गावात व जिल्हा रुग्णालय परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला असून एमआयडीसी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





