
शेतकरी जन आक्रोश मोर्चातील चिथावणीखोर भाषण आणि गैरकृत्यांप्रकरणी १३ जणांवर गुन्हा दाखल
जळगाव: शेतकरी जन आक्रोश मोर्चादरम्यान चिथावणीखोर भाषणे करून आंदोलकांना भडकावणे आणि जिल्हाधिकारी कार्यालयात अनधिकृत प्रवेश करून पोलिसांना धक्काबुक्की केल्याच्या आरोपावरून माजी खासदार उन्मेष पाटील, माजी आमदार बच्चू कडू यांच्यासह १३ जणांविरुद्ध गुरुवारी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणी १० कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे.
बुधवारी जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चातील सभेत उन्मेष पाटील यांनी आक्षेपार्ह आणि चिथावणीखोर वक्तव्ये केल्याचा आरोप आहे. तसेच, जिल्हाधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले असतानाही आंदोलकांनी जबरदस्तीने कार्यालयात प्रवेश केला आणि पोलिसांना धक्काबुक्की केली.
यात अॅड. जमील देशपांडे, गुलाबराव वाघ, शरद तायडे, भाऊसाहेब सोनवणे, संग्रामसिंग सूर्यवंशी, प्रमोद पाटील, बाळासाहेब पवार, विजय राठोड, कुलभूषण पाटील, संदीप पाटील आणि सुनील देवरे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणी नाईक भरत चव्हाण यांच्या तक्रारीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास सुरू आहे.





