
एम.जे. कॉलेज परिसरातील कॅफेवर रामानंद पोलिसांची कारवाई
जळगाव प्रतिनिधी: रामानंद नगर पोलीस स्टेशन हद्दीतील एम.जे. कॉलेज परिसरात असलेल्या एका कॅफेवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. काही महिन्यांपूर्वी या परिसरातील एका कॅफेमध्ये कॉलेज आणि शाळेतील विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा उपलब्ध करून देत अश्लील कृत्यांना प्रोत्साहन दिल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली होती. मात्र, अशा कारवायांनंतरही परिस्थितीत सुधारणा न झाल्याने पोलिसांनी पुन्हा कठोर पावले उचलली.
दिनांक 8 रोजी पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने एम.जे. कॉलेज परिसरातील “चॅट अड्डा” नावाच्या कॅफेवर छापा टाकला. या छाप्यादरम्यान कॅफेच्या वरच्या मजल्यावर 3×3 फूट आकाराचे प्लायवुडचे कंपार्टमेंट्स आढळले, ज्यामध्ये काही जोडपी अश्लील कृत्यांमध्ये गुंतलेली आढळली. याप्रकरणी कॅफे चालक मयूर धोंडू राठोड याच्याविरुद्ध मुंबई पोलीस कायदा कलम 129 आणि 131 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि सचिन रणशेवरे, पोहेकॉन्स्टेबल जितेंद्र राजपूत, जितेंद्र राठोड, सुधाकर अंभोरे, पोना मनोज सुरवाडे, रेवानंद साळुंखे, हेमंत कळसकर, विनोद सूर्यवंशी आणि योगेश बारी यांनी यशस्वीपणे पार पाडली.
पोलिसांनी अशा कॅफेंवर कडक कारवाईचे संकेत देत परिसरातील असामाजिक कृत्यांना आळा घालण्यासाठी सतत प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट केले आहे.





