जळगाव : मध्यप्रदेश, झारखंड, गुजरातसह जळगावातील वेगवेगळ्या भागांमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास घरफोडी करुन लाखो रुपयांचा ऐवज लांबविणाऱ्या परप्रांतीय फरार चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
बंटीकुमार पंचानंद सिंग (वय ३१, रा. घांगसिरसी जि. पटणा, बिहार, ह.मु. अमरोली, सुरत) व विजय देवचंद चंद्रवंशी (बागरी) (वय ३०, रा. लुसुडीया खेमा, जि. उज्जैन, ह.मु. सुरत) असे आरोपींची नावे आहेत.
शहरात दिवसेंदिवस वाढत असलेलया घरफोडीच्या घटनांना आळा घालून या घटना उघडकीस आणण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी पथक तयार करुन त्यांना शहरासह जिल्ह्यात
झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार पथकाकडून संशयितांचा शोध घेतला जात होता. शहरातील नवीपेठ भागातील विनीत आहुजा (रा. सिध्दी कॉलनी) यांचे मोबाईल दुकान तसेच नवीपेठ भागात झालेल्या चोऱ्यांसंदर्भात अधिक तपास करुन त्या गुन्ह्याची माहिती मिळाल्यावरुन पोलिस पथकाने सीसीटीव्ही फुटेज तपासून तांत्रिक विश्लेषन केले.
गुन्ह्याचा तपास करीत असतांना तांत्रिक विश्लेषनावरुन शहरात चोरी करणारे दोघे चोरटे राज्यातील घरफोडी करणारे बंटीकुमार पंचानंद सिंग व विजय देवचंद चंद्रवंशी (बागरी) हे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार दोघांना मध्य प्रदेशातील
नागदा येथून घरफोडीच्या साहित्यासह त्यांच्या मुसक्या आवळल्या. दोघांवर सुरत शहरात अनेक घरफोडीचे गुन्हे दाखल असून बंटीकुमार पंचानंद सिंग हा सुरत येथील तीन गुन्ह्यामध्ये फरार आहे. दोघांना ताब्यात घेवून पुढील कारवाईसाठी शहर पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले.
तीन राज्यात चोरीचे गुन्हे दाखल
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांची कसून चौकशी केली असता त्यांनी जळगाव शहरातील गुन्ह्यांसह मध्यप्रदेशातील रतलाम, झारखंड राज्यातील रांची व गुजरात राज्यातील सुरत येथील शहरात घरफोडी केल्याचे कबूली दिली. दोघांकडून वेगवेगळ्या राज्यातील बनावट आधार कार्ड व चोरी केलेले महागडे तीन मोबाईल फोन व नऊ हजार ७०० रुपये रोख जप्त करण्यात आले.
यांनी केली कारवाई
ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सफी रवी नरवाडे, पोहेकॉ संजय हिवरकर, संदीप पाटील, संदीप साळवे, पोना प्रवीण मांडोळे, ईश्वर पाटील, पोकॉ महेश सोमवंशी, प्रमोद ठाकूर, आदींनी कारवाई केली.