
राष्ट्रवादी नेते आ. एकनाथ खडसे यांच्या ‘मुक्ताई’ बंगल्यात धाडसी चोरी ; साडेसहा लाखांचा ऐवज लंपास
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील शिवराम नगर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांच्या ‘मुक्ताई’ या बंगल्यात मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी धाडसी घरफोडी करून सुमारे साडेसहा लाखांचा ऐवज चोरून नेल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोयंडा कापून आत प्रवेश करत रोकड, सोन्या-चांदीचे दागिने तसेच चांदीच्या भेटवस्तूंवर हात साफ केला.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी (दि. २८) सकाळी आठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. चोरट्यांनी बंगल्यातून तब्बल ३५ हजार रुपयांची रोकड, सोन्या-चांदीचे दागिने, तसेच भेट म्हणून मिळालेल्या चांदीच्या वस्तू असा एकूण ६ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.
‘मुक्ताई’ बंगल्याची देखरेख चेतन सुरेश देशमुख (वय ३६, रा. मुक्ताई हॉस्टेल, मू.जे. महाविद्यालय मागे) हे करत असतात. सोमवारी संध्याकाळी साडेसात वाजता त्यांनी नेहमीप्रमाणे बंगल्यातील लाईट सुरू करून सर्वकाही नीट असल्याची खात्री करून घेतली होती. मात्र, मंगळवारी सकाळी आठ वाजता साफसफाईसाठी आलेल्या महिलेसोबत जेव्हा त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा कडीकोयंडा तुटलेला दिसला. आत पाहता घरातील कपाटे अस्ताव्यस्त आढळून आली आणि त्यातून चोरी झाल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी चेतन देशमुख यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, शहरात अलीकडेच घडलेल्या घरफोड्यांच्या मालिकेमुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली असताना, नेत्यांच्या निवासस्थानातच झालेल्या या चोरीने पोलीस यंत्रणेचीही धावपळ उडाली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.





