
वढोदा वनक्षेत्रात चितळ शिकार करणाऱ्या दोन आरोपींना अटक; गावठी बंदुका, जाळी व बारूद जप्त
मुक्ताईनगर प्रतिनिधी
जिल्ह्यातील वढोदा वनक्षेत्र आणि प्रस्तावित ‘मुक्ताई–भवानी अभयारण्य’ या महत्वाच्या व्याघ्र अधिवास क्षेत्रात शिकार करण्यासाठी बेकायदेशीरपणे घुसलेल्या दोन संशयितांना वनविभागाच्या पथकाने मध्यरात्रीच्या धाडसाळ कारवाईत बंदुकीसह अटक करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, रात्री अंदाजे १२.२० वाजता मिळालेल्या गोपनीय सूचनेच्या आधारावर वढोदा वनपरिक्षेत्र अधिकारी, डोलारखेडा वनपरिमंडळासह गस्ती पथक कक्ष क्रमांक ५४२ सुकळी नियत क्षेत्रात तैनात असताना दोन व्यक्ती बंदुकीसह चितळाची शिकार करण्याच्या तयारीत आढळल्या. वनकर्मचाऱ्यांची चाहूल लागताच त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, परंतु पथकाने धैर्याने पाठलाग करून दोघांना घटनास्थळीच पकडले.
प्राथमिक चौकशीत आरोपींची नावे अजीज अन्सारी (वय २९) आणि जलील अहमद (वय ५०) अशी निष्पन्न झाली. त्यांच्याकडून दोन देशी बनावटीच्या बंदुका जप्त करण्यात आल्या असून, शिकार जाळी, बारूद आणि इतर साहित्यही हस्तगत करण्यात आले आहे. दोघांविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ही यशस्वी कारवाई उपवनसंरक्षक राम धोत्रे आणि सहाय्यक वनसंरक्षक सुदर्शन शिसवे यांच्या निर्देशाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी परिमल साळुंखे यांच्या नेतृत्वात वनपाल गणेश गवळी, वनरक्षक गोकुळ गोसावी, नवल जाधव, नितीन खंडारे, रजनीकांत चव्हाण, अक्षय मोरे आणि सुधाकर कोळी यांच्या संयुक्त पथकाने पार पाडली.
वनविभागाच्या या सजग आणि धाडसी कारवाईमुळे व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील वन्यजीव संरक्षणाला बळकटी मिळाली असून, स्थानिक नागरिक आणि वन्यजीवप्रेमींनी या कामगिरीचे भरघोस कौतुक केले आहे.





