जळगाव;- उत्तर प्रदेशमधील लखनऊ येथील सिटी मोंटेसरी आयोजित आंतरराष्ट्रीय रिफ्लेक्शन युथ फेस्टिव्हलमध्ये रायसोनी इस्टीट्युट संचलित जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या विध्यार्थ्यानी चमकदार कामगिरी करत उपविजेतेपद पटकावले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, आजच्या मुलांना आव्हानांचा सामना करण्यासाठी, पद्धती शोधण्यासाठी आणि गेम चेंजर्स व ट्रेंड सेटर म्हणून ते उदयास येण्यासाठी सक्षम बनवणे हा या रिफ्लेक्शन युथ फेस्टिव्हलचा प्रमुख उद्देश होता
. या चार दिवसीय स्पर्धेत भारत, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश, कतार येथील २०० च्या वर विध्यार्थ्यानी सहभाग नोंदविला. जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलचे यशस्वी विध्यार्थी पुन्हा आपल्या शहरात परतल्यानंतर जळगाव रेल्वेस्थानकावर त्यांचा ढोल ताशांच्या गजरात, औक्षण व गुलाबपुष्प देवून भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी स्कूलने विद्यार्थ्यांचे केलेले स्वागत पाहून विद्यार्थी आणि पालक भारावून गेले होते. स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी यशस्वी विध्यार्थ्यांना कौतुकाची थाप देत वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये त्यांनी भाग घेऊन उत्तम स्थान पटकावल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
सदर स्पर्धेत इयत्ता आठवी व नववीतील ऋतुजा भंडारी, श्रुष्टी काबरा, सम्या काबरा, अनया पलोडे, अशिता रायसोनी, देवश्री चंद्रवंशी, हिमांशू लोढा, परव जैन यांनी पोस्टर मेकिंग व सांस्कृतिक सादरीकरणात उपविजेतेपद पटकावले. सर्व धर्मांचा उद्देश एकच आहे, पण ते मांडण्याच्या वेगवेगळ्या पद्धती त्यांनी सांस्कृतिक सादरीकरणात मांडल्या. तर “माय सिटी-माय प्राउड” या थीमवर विध्यार्थ्यानी आपले पोस्टर बनवले. सदर स्पर्धेसाठी लीना त्रिपाटी व तस्नीम रंगरेज या शिक्षकांनी समन्वय साधला. पारितोषिके जिंकून शाळेत परतल्यावर गुरुवारी प्रार्थना सभेत या विध्यार्थ्यांचा जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या संचालिका सौ. राजुल रायसोनी यांच्या उपस्थितीत शालेय समितीतर्फे सत्कार करण्यात आला.