खान्देशगुन्हेजळगांव

रेल्वे स्क्रॅप चोरीच्या वादातून पूजाऱ्याची हत्या; अवघ्या २४ तासांत गुन्ह्याचा छडा

रेल्वे स्क्रॅप चोरीच्या वादातून पूजाऱ्याची हत्या; अवघ्या २४ तासांत गुन्ह्याचा छडा

ना साक्षीदार, ना तांत्रिक पुरावे; ‘बॉक्सर’च्या हळदीतील मारहाणीच्या व्हिडिओवरून पोलिसांना मिळाला महत्त्वाचा धागा

भुसावळ | प्रतिनिधी

भुसावळ शहरालगत रेल्वे मार्गाजवळ ५५ वर्षीय संतोष रघुवीर मंचाल यांच्या हत्येचे गूढ भुसावळ शहर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत उकलले आहे. कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, मोबाईल लोकेशन, हत्यार किंवा घटनास्थळी भौतिक पुरावे नसतानाही पोलिसांनी मानवी गुप्त माहिती (ह्युमन इंटेलिजन्स) आणि तपासातील बारकाव्यांच्या आधारे तिघा आरोपींना अटक करत गुन्ह्याचा छडा लावला.

२८ जून २०२६ रोजी रात्री भुसावळ शहराजवळील रेल्वे लाइन परिसरातील निर्जन ठिकाणी संतोष रघुवीर मंचाल (वय ५५) यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४५/२०२६ भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) अन्वये नोंद करण्यात आला होता.

या हत्येच्या तपासात पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे होते. घटनास्थळी कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता, तांत्रिक पुरावे उपलब्ध नव्हते, तसेच हत्येसाठी वापरण्यात आलेले कोणतेही हत्यार किंवा अन्य भौतिक पुरावेही मिळाले नव्हते. त्यामुळे तपास पूर्णपणे अंधारात सुरू होता.

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, भुसावळ विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड घटनास्थळी धाव घेत तपासाची सूत्रे हाती घेतली. दरम्यान, गुप्त माहितीदारांचे जाळे सक्रिय करण्यात आले.

तपासादरम्यान शवविच्छेदन अहवालात जबड्यावर आणि बरगड्यांवर झालेल्या जबर मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. कोणतेही हत्यार न वापरता केवळ मारहाणीतून मृत्यू झाल्याने पोलिसांनी आरोपी शारीरिकदृष्ट्या सक्षम, बॉक्सर किंवा खेळाडू असण्याची शक्यता गृहीत धरून तपास सुरू केला.

याचवेळी पोलिसांना महत्त्वाचा धागा मिळाला. घटनेच्या रात्रीच एका हळदी समारंभात झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ समोर आला. त्या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीला बेदम मारहाण करणारा हर्षल राजू वर्मा, जो बॉक्सर म्हणून ओळखला जातो, हा दिसून आला. त्याच्या हालचाली आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याच्यावर लक्ष केंद्रित केले.

मानवी गुप्त माहितीच्या आधारे हर्षल वर्मा आणि त्याच्या साथीदारांना ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला त्यांनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कौशल्यपूर्ण चौकशीनंतर त्यांच्या कथनातील विसंगती उघड झाली आणि अखेर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

तपासात हर्षल राजू वर्मा, क्षितिज संजय भालेराव आणि प्रफुल उत्तम जाधव या तिघांचा हत्येत थेट सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.

आरोपींच्या कबुलीनुसार, ते रेल्वेचे लोखंडी स्क्रॅप चोरी करण्यासाठी गेले होते. त्याचवेळी संतोष मंचाल तेथे आल्याने त्यांच्यात वाद झाला. हा वाद हाणामारीत बदलला आणि रागाच्या भरात आरोपींनी संतोष मंचाल यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीतच त्यांचा मृत्यू झाला.

अत्यंत कमी धागेदोरे असतानाही मानवी गुप्त माहिती, वैज्ञानिक तपास आणि विविध पथकांच्या समन्वयातून भुसावळ पोलिसांनी हा गुन्हा अवघ्या एका दिवसात उघडकीस आणत पुन्हा एकदा प्रभावी टीमवर्कचे दर्शन घडवले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button