क्रीडा

महाराष्ट्र केसरी : हमालाचा पोरगा अखेर ठरला ‘सिकंदर’

खान्देश टाईम्स न्यूज l १० नोव्हेंबर २०२३ l दहा महिन्यांपूर्वी गतवेळच्या महाराष्ट्र केसरीच्या विजेतेपदाची संधी हुकलेल्या, पण कुस्तीशौकिनांची मने जिंकलेल्या वाशिमच्या सिकंदर शेखने यंदाच्या महाराष्ट्र केसरीची गदा पटकावत ‘यहाँ के हम सिकंदर’ हे दाखवून दिले. कुस्तीच्या पंढरीत कोल्हापूरच्या गंगावेस तालमीत मेहनत घेणाऱ्या सिकंदरने अवघ्या २२ सेकंदांत ६६व्या महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला. अंतिम फेरीच्या लढतीत सिकंदरने गत महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेला २२ सेकंदांत झोळी डावावर चितपट केले. विजेत्या सिकंदरला थार गाडी, गदा असे पारितोषिक देण्यात आले. उपविजेता शिवराज ट्रॅक्टरचा मानकरी ठरला.

पुण्याच्या हवेली तालुक्यातील फुलगावमध्ये सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेमध्ये महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेच्या किताबासाठी शनिवारी अंतिम लढत झाली. प्रदीप कंद व पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि भारतीय कुस्ती महासंघ व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने ६६ वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवण्यात आली होती.
गतवेळचा महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि संभाव्य विजेता मानल्या जाणाऱ्या सिकंदर शेख यांच्यात अंतिम लढत झाली. अंतिम लढतीत सिकंदरचे पारडे निश्चित जड होते. पण शिवराज त्याला आव्हान देईल, अशी अपेक्षा होती. मात्र वेगवान आणि आक्रमक कुस्ती खेळणाऱ्या सिकंदरपुढे शिवराजचा निभाव लागला नाही. लढतीला सुरुवात झाल्यावर अवघ्या काही सेकंदांत सिकंदरने झोळी डाव घेत शिवराजला उचलून खाली घेतले आणि त्याच स्थितीत शिवराजला चितपट करून विजेतेपदाचा मान मिळवला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button