खान्देश टाईम्स न्यूज | १५ नोव्हेंबर २०२३ | दिवाळी पाडवा संपताच भाऊबीजेच्या उगवत्या पहाटने एक क्रूर बातमी समोर आणली आहे. शेतासह शेतीसाहित्याची रखवाली करण्यासाठी आलेल्या बिलवाडीतील ५२ वर्षीय रखवालदाराची दरोडेखोरांनी निर्घृण हत्या करीत ट्रॅक्टर लांबवले. ही घटना जळगाव तालुक्यातील वावडदा ते म्हसावद दरम्यान वावडदा शिवारात घडली. पांडुरंग पंडित पाटील (52, बिलवाडी) असे खून झालेल्या प्रौढाचे नाव आहे.
बिलवाडी येथील रहिवासी असलेले रखवालदार पांडुरंग पंडित पाटील (52, बिलवाडी) हे हे ईश्वर मन्साराम पाटील यांचे वावडदा ते म्हसावद दरम्यान असणार्या शेतामध्ये रखवालदारी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मंगळवार, दि.१४ नोव्हेंबर रोजी ते शेतामध्ये रखवालदारी करण्यासाठी रात्री गेले असता मध्यरात्री दरोडेखोरांनी शेतात प्रवेश करीत रोटोव्हेटर व ट्रॅक्टर चोरी करण्याचा प्रयत्न केल्यानंतर रखवालदार पांडुरंग पाटील यांनी विरोध केला व दरोडेखोरांनी डोक्यात लोखंडी वस्तू मारून त्यांचा खून केला आणि ट्रॅक्टरसह रोटाव्हेटर घेवून पळ काढला.
बुधवारी पहाटे सहा वाजता शेतमालक ईश्वर पाटील यांचा मुलगा राजेंद्र ईश्वर पाटील हा म्हशीचे दूध काढण्यासाठी शेतात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. गावातील पोलीस पाटील सुवर्णा उंबरे आणि पोलिसांना याबाबत माहिती कळवल्यानंतर एमआयडीसी पोलिसांना माहिती कळवण्यात आली. एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे व इतर पोलिस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून तपासाला वेग दिला आहे.
दरम्यान शेतातून चोरून नेलेले ट्रॅक्टर हे एरंडोल तालुक्यातील खडके फाटा येथे आढळून आले आहे. पांडुरंग पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. पांडुरंग पाटील यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवण्यात आला. यावेळी कुटूंबियांनी मन हेलावणारा आक्रोश केला.