खान्देश टाइम्स न्यूज | ४ जुलै २०२३ | जळगाव जिल्ह्यात वाळू माफिया आणि महसुली कर्मचाऱ्यांचे हितसंबंध काही लपून राहिलेले नाही. गेल्या काही दिवसापासून साहेबांपेक्षा एका कर्मचाऱ्याची चर्चा जास्त रंगत आहे. कर्मचाऱ्याचा वट तर असा आहे की चक्क एका आलिशान रेसिडेन्सीत वाळू व्यावसायिकाच्या फ्लॅटमध्ये त्याचे वास्तव्य असल्याची चर्चा आहे.
जळगाव जिल्ह्यात आणि विशेषतः शहरात वाळू वाहतूक तुफान सुरू आहे. वाळू वाहतुकीवरून कर्मचाऱ्यांवरच नव्हे तर जिल्हाधिकारी अमन मित्तल, तहसीलदार नामदेव पाटील, तलाठी, मंडळ अधिकारी यांच्यावर देखील आरोप झाले आहे. काही महिन्यांपूर्वी तर वाळू वाहतुकीच्या आर्थिक देवाण – घेवाण बाबत असलेली ऑडियो क्लीप देखील व्हायरल झाली होती.
गेल्या काही दिवसापासून खान्देश टाइम्स न्यूज नेटवर्ककडून महसुलाचे काही पत्ते उघड केले जात आहेत. बातमीचा परिणाम म्हणून कारवाया देखील केल्या जात असून प्रशासन अंतर्गत कामाला लागले आहे. दोन दिवसापूर्वीच जिल्हाधिकारी अमन मित्तल मध्यरात्री एका खाजगी वाहनाने वाळू चोरांवर कारवाई केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी तीन डंपरवर आणि ५ ट्रॅक्टरवर कारवाई केली होती.
साहेब रस्त्यावर उतरून काम करीत असले तरी काही कर्मचारी मात्र मजा करीत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महसुलच्या एका कर्मचाऱ्याचा वट साहेबांपेक्षा देखील मोठा आहे. धुळे महामार्गालगत असलेल्या एका आलिशान रेसिडेन्सीमध्ये वाळू व्यावसायिकाच्या फ्लॅटमध्ये या महसुली कर्मचाऱ्याचे वास्तव्य आहे. इतकेच काय तर चौधरी नामक एका वाळू माफियाचे वाहन त्या कर्मचाऱ्याच्या दिमतीला असल्याची चर्चा जोरात सुरू आहे.
महसुलातील या कर्मचाऱ्यामुळे वाळू माफियांचा एक गट नाराज असून दबक्या आवाजात चर्चा करीत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष न दिल्यास वाळू माफिया पुन्हा एकदा महसूल विभागाला लक्ष करतील आणि एखाद्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा साप आवळला जाईल यात शंका नाही.