साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर;- अमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्राताई महाजन यांच्या हस्ते होणार आहे. याबाबत सुमित्राताई महाजन यांनी अ.भा. मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा.उषाताई तांबे यांना पत्र पाठवून स्विकृती कळवली असल्याची माहिती संमेलनाचे समन्वयक प्रा.डॉ.नरेंद्र पाठक व म.वा.मंडळाचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी यांनी दिली.
९७ वे मराठी साहित्य संमेलन २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर येथील पू.साने गुरुजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालयात होत आहे. संमेलनाचे उद्घाटन सुमित्राताई महाजन यांच्या हस्ते होणार आहे. या संमेलन समारोपाच्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितिन गडकरी उपस्थित राहणार आहेत. तसेच संमेलानासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी येण्याचे मान्य केले आहे.
संमेलनाची जय्यत तयारी सुरु असून संमेलनाचा उत्साह संपूर्ण खान्देशात दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर संमेलनाचे निमंत्रक तथा राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी महाविद्यालयात जावून युवक-युवतींशी संवाद साधला. संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा राज्याचे ग्रामविकास व पर्यटनमंत्री गिरीश महाजन, प्रमुख संरक्षक व सल्लागार तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, संरक्षक व सल्लागार तथा जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन हे देखील संमेलनाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करत असल्याचे डॉ.अविनाश जोशी यांनी सांगितले.
संमेलनासाठी कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. दरम्यान, प्रताप महाविद्यालयात उभारण्यात येत असलेल्या साने गुरुजी साहित्य नगरीचे काम देखील अंतिम टप्प्यात आले आहे. वेगवेगळ्या सभागृहांची आखणी, ग्रंथप्रदर्शन दालन उभारणी जागेचे सपाटीकरण, परिसरातील अंतर्गत रस्ते बांधकाम, स्वच्छतागृह उभारणी, पार्किंग व्यवस्था आदी कामे जोमाने सुरु असल्याचे डॉ.जोशी यांनी सांगितले.