आठ जणांविरुद्ध मेहुणबारे पोलिसांत गुन्हा
चाळीसगाव ;- गटारीच्या साचलेल्या पाण्याची साफसफाई केल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून धारदार शस्त्राने वार व मारहाणीत एका ५५ वर्षीय प्रौढाला जीवास मुकावे लागल्याची घटना तालुक्यातील सुंदर नगर तांडा येथे ८ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली . याप्रकरणी आठ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव तालुक्यातील सुंदरनगर तांडा क्रं. 1 येथील रहिवासी व तक्रारदार खंडू पंडीत मोरे (29) यांच्या घरासमोर असलेल्या नालीच्या पाण्याची सफाई त्यांच्या आईने केली होती. त्याचा राग आल्याने संशयित दीपक भावसिंग माळी व अशोक भावसिंग माळी या दोघा भावांनी खंडू मोरे यांना शिवीगाळ केली. आपल्याला शिवीगाळ का केली याचा जाब विचारण्यासाठी खंडू मोरे हे दीपक माळी याचे काका उत्तम लाला माळी यांच्याकडे गेले.
खंडू मोरे आणि लाला माळी हे दोघे आपसात बोलत असतांना संशयित दीपक भावसिंग माळी, अशोक भावसिंग माळी, श्रीकांत माळी, प्रल्हाद, आदित्य माळी, दिपकचा भाचा असे सर्वजण खंडू मोरे यांच्या अंगावर धावून आले. सर्वांनी मिळून खंडू मोरे यांना चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली.
खंडू मोरे यांना होत असलेली मारहाण बघून त्यांची आई, बहिण आणि वडील पंडीत मोरे असे तिघेजण वाद सोडवण्यास आले. दीपक भावसिंग माळी व अशोक भावसिंग माळी या दोघा भावांनी त्यांच्या हातातील लाकडी दांडक्याने पंडीत मोरे यांना मारहाण सुरू केली. त्यात ते गंभीर जखमी झाले. पंडीत मोरे यांना होणारी मारहाण बघून खंडू मोरे यांची बहिण भांडण सोडवण्यास आली. त्यावेळी लक्ष्मीबाई माळी व सिीमा बागुल या दोघींनी खंडू मोरे यांच्या बहिणीला पकडून ठेवत धक्काबुक्की व शिवीगाळ केली. या घटनेदरम्यान कुणीतरी धारदार शस्त्राने पंडीत मोरे आणि खंडू मोरे यांच्या बहिणीच्या पाठीवर वार केले. त्यात पंडीत मोरे वैद्यकीय उपचारादरम्यान मृत्यू झाला. तपास सहाय्यक निरीक्षक संदीप परदेशी करीत आहेत.