खान्देश टाइम्स न्यूज | ११ जानेवारी २०२४ | जळगाव शहरातील द्रौपदी नगरात राहणारे बॅंक अधिकारी बुधवारी रात्री शतपावली करीत असताना अज्ञात दुचाकीस्वार तरुणांनी त्यांचा मोबाईल हिसकावून पळ काढला होता. जिल्हापेठ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल होताच अवघ्या २४ तासात संशयितांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी चोरट्यांकडून चोरीस गेलेला मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी हस्तगत केली आहे.
शहरातील द्रोपदी नगर येथे राहणारे सुनिल एकनाथ भामरे हे बुधवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास जेवण करुन शतपावली करीत असतांना मानराज पार्क जवळील, नवजीवन सुपर शॉप समोरुन मोबाईलवर बोलत जात होते. पायी जात असताना पाठीमागुन एक मोटार सायकलवर आलेल्या अज्ञात तीन आरोपीतांनी त्यांचा मोबाईल हातातुन हिसकावून पळुन गेले होते. सुनील भामरे यांनी याबाबत जिल्हापेठ पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक डॉ.विशाल जैस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील हवालदार सलीम तडवी, पोलीस नाईक जुबेर तडवी, अमितकुमार मराठे अश्यांना मिळालेल्या गुप्त बातमिच्या आधारे त्यांनी तपास सुरु केला.
पथकाने शहरातील शिवकॉलनी परिसरातुन संशयित आरोपी गजानन ऊर्फ बबन प्रकाश कोळी वय-१९ रा.शिवकॉलनी स्टॉप जवळ, मटके विक्रीच्या ठिकाणी जळगांव ता.जि. जळगांव. मु.रा. साकेगांव ता. भुसावळ जि. जळगांव. यास ताब्यात घेवून अधिक चौकशी केली असता, त्याने हिसकवलेला मोबाईल व गुन्हयात वापरलेली मोटार सायकल काढून दिल्याने त्यास सदर गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे. तसेच त्याचे साधीदार हे देखील निष्पन्न झाले असून त्यांना लवकरात लवकर ताब्यात घेण्यासाठी गुन्हे शोध पथक काम करीत आहे.
पोलिसांनी संशयित आरोपींकडून गुन्ह्यात चोरलेला मोबाईल आणि दुचाकी हस्तगत केली आहे. सदर गुन्हयाची कामगिरी अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उप विभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत व पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांनी केलेल्या मार्गदर्शनाने गुन्हे शोध पथकातील पो.हे.कॉ.सलीम तडवी, जुबेर तडवी, अमितकुमार मराठे यांनी केले असून गुन्हयाचा पुढील तपास पो.उप.निरी.शांताराम देशमुख व सिध्दार्थ सुरवाडे हे करीत आहेत.