जळगाव ;- शहरातील मारोतीपेठ भागात असणाऱ्या सीताराम प्लाझा येथील श्री अलंकार नावाच्या दागिने बनविणाऱ्या दुकानाचे आणि दुसर्या पॉलिश छिलाई सेंटर नावाचे दुकानचे अज्ञात चोरटयांनी लोखंडी गेट आणि चॅनेल गेट चे कुलूप कापून ड्रॉवरमध्ये असणारे सुमारे १४ लाख ५९ हजार रुपयांचे सोन्याचे रॉ मटेरियल चोरटयांनी लांबविल्याचा प्रकार २६ रोजी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास उघडकीस आला असून यामुळे सराफ व्यावसायिकांमध्ये खळबळ उडून घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत शनिपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते,उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित ,पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे आदींनी भेट दिली .
याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, सचिन प्रभाकर सोनार वय ३८ हे राम पेठ जळगाव येथे वास्तव्याला असून त्यांचे मारोती पेठ येथील सीताराम प्लाझा येथे तिसऱ्या मजल्यावर श्री अलंकार नावाचे दागिने बनविण्याचे दुकान आहे. अज्ञात चोरटयांनी २५ जानेवारी च्या रात्री ९ ते २६ जानेवारीच्या पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास लोखंडी गेट आणि चॅनेल गेटचे कुलूप कापून दुकानातील ड्रॉवर मध्ये ठेवलेले २५१. ७८० ग्राम वजनाचे सोन्याचे रॉ मटेरियल असे एकूण १४ लाख ५९ हजार ५२४ रुपयांचे चोरटयांनी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला . सचिन सोनार यांनी याबाबत शनिपेठ पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उप निरीक्षक प्रिया दातीर करीत आहे.
दरम्यान चोरटयांनी शहरातील अतिशय गजबजलेल्या जुने जळगाव भागात केलेल्या या धाडसी घरफोडीमुळे खळबळ उडाली आहे.