जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभागाच्यावतीने दि. १६ व १७ फेब्रुवारी २०२४ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय चर्चासत्रात सेनादलाचा सक्रिय सहभाग असणार आहे.
भारतीय सेनादलाचे लष्कर प्रमुख श्री. मनोजकुमार पांडे यांचे प्रतिनिधी म्हणून विशेष आमंत्रित म्हणून ब्रिगेडयर राहुल दत्त (उत्तर महाराष्ट्र आणि गुजरात क्षेत्र प्रमुख) हे उद्घाटन सत्रातील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये देशभरातील अनेक प्रतिष्ठीत विद्यापीठातून शोध निबंध सादर केले जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने मद्रास विद्यापीठ, जम्मु विद्यापीठ, गुजरात विद्यापीठ, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश या राज्यातील संशोधकांचा समावेश आहे. १५० शोधनिबंधांची नोंदणी झालेली असून २७५ प्रतिनिधींची औपचारिक नोंदणी झालेली आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जय्यत तयारी सुरू असून सुकाणू समितीच्या मार्गदर्शनाखाली समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत. चर्चासत्राचे बीजभाषण ज्येष्ठ विचारवंत डॉ. विनय सहस्त्रबुध्दे हे करणार असुन देशभरातील मान्यवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने मेजर जनरल डॉ. जी. डी. बक्षी (निवृत्त) सेनापदक, विशिष्ठ सेवापदक, दिल्ली, डॉ. श्रीकांत परांजपे (माजी संचालक यशवंतराव चव्हाण आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण विश्लेषक राष्ट्रीय केंद्र सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे), श्री. जयंत उमराणीकर (माजी पोलीस महासंचालक, महाराष्ट्र), श्री विक्रमसिंह बाजी मोहिते (भारत इतिहास संशाधक मंडळाचे सदस्य, पुणे), श्री. प्रकाश पाठक (माजी सरकार्यवाह, सेंट्रल हिंदु मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक), श्री. रघुजीराजे आंग्रे (अध्यक्ष श्री. शिवाजी रायगड स्मारक मंडळ, पुणे), श्री. सुधीर थोरात (महाराष्ट्र शासनाच्या किल्ले रायगड प्राधिकरणाचे सल्लागार, पुणे),डॉ. सचिन जोशी (पुरातत्व विभाग डेक्कन कॉलेज, पुणे), डॉ. श्री. वरूण भामरे (रायगड विकास प्राधिकरण, रायगड), डॉ. अशोक राणा (अमरावती), डॉ. कमाजी डख (छत्रपती संभाजीनगर), यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
या चर्चासत्रात १) राष्ट्र उभारणीत छत्रपती शिवाजी महाराजांचा राष्ट्रीय दृष्टीकोन २) छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे महत्व ३) छत्रपती शिवाजी महाराजांची गनिमीकावा, नीती आणि तिचे सध्यकालीन महत्व ४) छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोहिमेतील गुप्तहेर यंत्रणेचे महत्व ५) शिवकालीन किल्ल्यांचे भू-सामरिक महत्व ६) मराठा साम्राज्यातील लष्करी व्यवस्था आणि शस्त्र प्रकार ७) मराठा आरमार बांधणीचा दूरगामी उद्देश आणि महत्व ८) मराठ्यांचे युध्दतंत्र आणि रणनीती ९) छत्रपती शिवाजी महाराजांची लोकाभिमुख प्रशासन व्यवस्था १०) महाराजांच्या अष्टप्रधान मंडळाची भूमिका आणि कार्यपध्दती ११) राज्यव्यवहारकोष : मराठी भाषा संवर्धन १२) भारताचा स्वातंत्र्य चळवळीचे प्रेरणास्त्रोत या उपविषयांवर चर्चा व शोधनिबंध सादर होतील. या सर्व शोधनिबंधाचे प्रकाशन केले जाणार असून संशोधकांसाठी ही एक खुप मोठी संधी असणार आहे असे या चर्चासत्राचे समन्वयक डॉ. तुषार रायसिंग यांनी कळविले आहे.