खान्देश टाइम्स न्यूज । २ एप्रिल २०२४ । जळगाव जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गट भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील हे उमेदवारी न दिल्याने नाराज असल्याच्या चर्चा आहेत. खा.उन्मेष पाटील हे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या भेटीसाठी मुंबईत दाखल झाले असल्याची माहिती येत असून ते लवकरच शिवसेना उबाठा गटात प्रवेश घेणार असल्याचे म्हटले जात आहे.
जळगाव लोकसभा मतदार संघातील विद्यमान खा.उन्मेष पाटील यांचा पत्ता यंदा कट करण्यात आल्याने ते नाराज असल्याचे म्हटले जात आहे. काही दिवसापूर्वी उन्मेष पाटील नॉट रीचेबल देखील होते. दरम्यान, उन्मेष पाटील ठाकरे गटात प्रवेश करून खासदारकी लढवणार असल्याच्या चर्चा आहेत. सध्या उन्मेष पाटील संजय राऊतांची भेट घेऊन त्यांच्याशी प्राथमिक चर्चा करणार आहेत. या चर्चेनंतर उन्मेष पाटील ठाकरे गटात जाण्याबाबतचा निर्णय पक्का करतील, अशी माहिती समोर येत आहे.
विशेष उन्मेष पाटील यांच्यासह पारोळा येथील नगराध्यक्ष करण पवार, पाचोरा येथील भाजप तालुकाध्यक्ष अमोल शिंदे आणि अमळनेर येथील माजी आमदार शिरीष चौधरी हे ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत, अशी माहिती समोर येत आहे. एकनाथराव खडसेंच्या सोबत आले नव्हते. तेवढे कार्यकर्ते भाजप सोडून ठाकरे गटात प्रवेश करतील, असे म्हटले जात आहे. आज किंवा उद्या या दोन दिवसात मोठ्या घडामोडी घडणार आहे, असंही करण पवार यांनी सांगितले आहे.