गुन्हे

पोलीस दलात खळबळ : एलसीबी पीआयसह दोन कर्मचारी लाच घेताना सापडले

खान्देश टाइम्सन्यूज | १ एप्रिल २०२४ | सध्या निवडणूक आचारसंहिता सुरू असून गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू आहेत. धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या निरिक्षकासह दोन कर्मचाऱ्यांनी एका व्यक्तीकडून हद्दपार कारवाई न करण्यासाठी २ लाखांची लाच मागितल्या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. धुळे येथे झालेल्या कारवाईने संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडाली आहे. तडजोडी अंती १ लाख ५० हजार रंगेहाथ घेताना पोलिसांनी हवालदारला ताब्यात घेतले.

मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार हे दोंडाईचा ता. शिंदखेडा जि.धुळे येथील रहिवाशी असून राजकिय व सामाजिक चळवळीत सकिय आहेत. तकारदार यांचे त्यांच्या राजकिय सहका-यांशी मतभेद झाल्याने राजकिय आकसाने त्यांचे विरुध्द दोंडाईचा पो.स्टे. येथे राजकिय गुन्हे दाखल झाले आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार नितीन मोहने व पोलीस हवालदार अशोक पाटील यांनी तक्रारदार यांची भेट घेऊन त्यांना तुझ्यावर यापुर्वी दाखल असलेल्या गुन्हयांची माहिती काढुन तसेच तुझ्यावर गुन्हे नोंद करुन लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता पार्श्वभुमीवर पोलीस स्टेशनकडुन प्रस्ताव मागवुन तुला जिल्हयातुन हददपार करणार असल्याचे सांगितले. तसेच कारवाई होवू द्यायची नसेल तर पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे साहेबांना २ लाख रुपये दयावे लागतील असे सांगुन तकारदार यांना पोलीस निरीक्षक शिंदे यांची भेट घेण्यास सांगितले.

तक्रारदार यांनी दि.१ एप्रिल रोजी ला.प्र.वि. धुळे कार्यालयाकडे तक्रार दिली होती. तकारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलीस अधीक्षक कार्यालय, धुळे येथील स्थानिक गुन्हे शाखेत जावुन पडताळणी केली असता पोलीस निरीक्षक दत्तात्रय सखाराम शिंदे, यांनी तकारदार यांचेकडुन पंचासमक्ष २ लाख रुपये लाचेची मागणी करुन रक्कम पोलीस हवालदार नितीन आनंदराव मोहने व अशोक साहेबराव पाटील यांना देण्यास सांगितले. दोन्ही कर्मचाऱ्यांनी तडजोडीअंती १ लाख ५० हजार रुपये लाचेची रक्कम ठरवली. सोमवारी सायंकाळी दोंडाईचा येथील धुळे रस्त्यालगत असलेल्या जैन मंदिरा समोरील मोकळ्या जागेत हवालदार मोहने यांनी पंचासमक्ष स्वतः लाच स्वीकारली असून त्यांचे विरुध्द भ्र.प्र. अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

संपूर्ण कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रविण मोरे, प्रशांत बागुल, प्रविण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी केली आहे. कारवाईसाठी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व वाचक पोलीस अधीक्षक नरेंद्र पवार यांचे मार्गदर्शन लाभले आहे. गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button