खान्देश टाइम्स न्यूज | २२ जुलै २०२३ | जकी अहमद l नशिराबाद येथील पुलावर अपघातांचे सत्र सुरूच असून आज जिल्हा केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष सुनील भंगाळे यांच्या चारचाकी गाडीचे टायर फुटून भीषण अपघात झाला. वाहनाचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने अपघातात चारचाकीमधील चौघे बचावले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील माजी महापौर विष्णू भंगाळे यांचे बंधू जिल्हा केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष सुनील भंगाळे हे दि.२२ रोजी भुसावळकडून जळगावच्या दिशेने येत असतांना दुपारी ४ वाजेच्या सुमारास त्यांच्या चारचाकी क्रमांक एमएच.१९.सीओ.८२४० या गाडीचे टायर फुटले. वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने चारचाकी गाडी पलटी झाली. हा अपघात नशिराबाद पुलावर झाला असून गाडीने पलटी घेतल्यावर रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी लागलीच धाव घेत चारचाकीतील सर्वांना बाहेर काढून जीवदान दिले आहे.
चारचाकीमध्ये सुनील भंगाळे यांच्या समवेत जळगाव जिल्हा संघटनेचे सचिव अनिल झंवर, इरफान सालार, दिनेश मालू हे देखील होते. या अपघातात कोणालाही इजा पोहचलेली नसून सर्व जण सुखरूप आहेत. ही चारचाकी जिल्हा सचिव अनिल झंवर यांची होती. सर्वांवर प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.