
भांडण सोडवायला गेलेल्या तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला
जळगावमध्ये मध्यरात्रीची थरारक घटना; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव, मित्रांचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणावरच धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. योगेश ज्ञानेश्वर सोनवणे (वय ३१, रा. वाल्मिक नगर, जळगाव) असे जखमी तरुणाचे नाव आहे. ही घटना दि. ११ मार्च रोजी रात्री १०.३० वाजता वाल्मिक नगरात घडली. हल्लेखोर टोळक्याने धारदार शस्त्राने सपासप वार करून योगेशला गंभीर जखमी केले. या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय घडला प्रकार?
योगेश सोनवणे हा वाल्मिक नगर येथे राहत असून, दोन महिन्यांपूर्वी त्याचा हेमंत रायसिंगे याच्यासोबत किरकोळ वाद झाला होता. दि. ११ मार्च रोजी रात्री योगेश हळदीच्या कार्यक्रमावरून घरी परतत असताना त्याला मित्र शुभम सपकाहे याचा फोन आला. बाळू रायसिंगे, हेमंत रायसिंगे, सागर आणि रोहित हे त्याला शिवीगाळ करत असल्याचे सांगत, त्याला घराजवळ बोलावले.
योगेश तातडीने तिथे पोहोचला असता, बाळू रायसिंगे याने त्याला शिवीगाळ करीत झडप घातली व बेदम मारहाण केली. त्यानंतर धीरज रायसिंगे याने धारदार शस्त्राने योगेशच्या गळ्यावर वार केला, तर सागर तायडे याने डोक्यावर व खांद्यावर वार केले. यामुळे तो गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर कोसळला. स्थानिक नागरिकांनी धाव घेत त्याला हल्लेखोरांच्या तावडीतून सोडवले आणि तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
सदर प्रकरणी बाळू रायसिंगे, हेमंत रायसिंगे, सागर तायडे, धीरज रायसिंगे आणि रोहित रायसिंगे यांच्याविरुद्ध दंगलीसह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले करीत आहेत.
शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याची दुसरी घटना
गेल्या काही दिवसांपासून शनिपेठ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येणाऱ्या परिसरात हाणामारी प्राण घातक हल्ला असे प्रकार असे प्रकार नित्याचेच झाले असून चार दिवसांपूर्वी काट्या फाईल परिसरामध्ये एका तरुणावर टोळक्याने घातक शस्त्रांसह हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती. मात्र या घटनेतील आरोपी हे अद्यापही फरार असल्याने शनिपेठ पोलिसांची यंत्रणा कुचकामी ठरली असून या घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतांना वाल्मिक नगर मध्ये राडा झाल्याने शनिपेठ पोलिसांच्या कार्यक्षमतेवर टीका होत आहे. त्यामुळे काट्याफईल परिसरात घडलेली घटना ताजी असताना वाल्मीक नगर येथे उभ्या असलेल्या तरुणावर टोळक्याने शस्त्रांसह हल्ला केल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गुन्हेगारांना पोलिसांचा धाक संपला का काय अशी वस्तुस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.कायदा सुव्यवस्थेचे शनिपेठ पोलिसांकडून तीन तेरा झाल्याने पोलीस निरीक्षक अपयशी ठरल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. अशा वारंवार घडणार्या या घटनांमुळे शनिपेठ पोलीस स्टेशन हद्दीत समावे असणाऱ्या संवेदनशी भागातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पाहायला मिळत असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन गुन्हेगारी प्रवृत्तींना ठेचून याचा बिमोड करावा अशी मागणी देखील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.