रुग्णालयात उपचारासाठी दाखल अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; डॉक्टर अटकेत

रुग्णालयात उपचारासाठी दाखल अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; डॉक्टर अटकेत
संगमनेर तालुक्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीशी डॉक्टराने कथितरित्या गैरवर्तन केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे वैद्यकीय वर्तुळात आणि परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी संबंधित डॉक्टरला नाशिक येथून अटक केली आहे.
पीडित अल्पवयीन मुलगी संगमनेर येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत असून, तिला श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने ४ एप्रिल रोजी शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, उपचारादरम्यान डॉक्टर अमोल कर्पे यांनी रविवारी पहाटे मुलीशी कथितरित्या गैरवर्तन केलं. या घटनेची माहिती मुलीने आपल्या पालकांना दिल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रारीच्या आधारे पोलिसांनी त्वरित गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. दरम्यान, डॉक्टर कर्पे हे घटनास्थळावरून फरार झाले होते, मात्र पोलिसांनी नाशिक येथे शोध घेत त्यांना ताब्यात घेतले आहे.
घटनेनंतर पीडितेच्या नातेवाइकांनी रुग्णालयाबाहेर गर्दी करत संताप व्यक्त केला. त्यामुळे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
या प्रकरणी अधिक तपास सुरू असून, आरोपी डॉक्टरविरोधात संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी नागरिकांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.