दरोड्याच्या तयारीत असलेला आरोपी थरारक पाठलागानंतर जेरबंद; गोवंश व शस्त्रसाठा जप्त

दरोड्याच्या तयारीत असलेला आरोपी थरारक पाठलागानंतर जेरबंद; गोवंश व शस्त्रसाठा जप्त
जळगाव : प्रतिनिधी l स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाडसी कारवाई करत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीपैकी एका संशयितास अकोला जिल्ह्यातील रिधोरा शिवारात थरारक पाठलागानंतर अटक केली. या कारवाईत पोलिसांनी एक चोरलेला बैल, तलवार, गुप्ती, चाकू, लोखंडी रॉडसह दरोड्यात वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली १५ जून रोजी रात्री गस्त घालण्यात येत असताना मुक्ताईनगर तालुक्यातील कुंड गावात इनोव्हा कारमधून चार संशयित व्यक्ती एका घराजवळ उतरलेले दिसले. पोलिसांची चाहूल लागताच ते वाहनातून पलायन करू लागले. पोलिसांनी तत्काळ कारचा पाठलाग सुरू केला.
या दरम्यान आरोपींनी पोलिसांच्या गाडीला कट मारून वाहन रोखण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती जळगाव नियंत्रण कक्षाद्वारे मलकापूर, नांदुरा, बुलढाणा आणि अकोला पोलिसांना देण्यात आली. शेवटी १६ जून रोजी पहाटे ३.४० वाजता अकोला जिल्ह्यातील रिधोरा शिवारात नागपूर-धुळे महामार्गावर ट्रक लावून नाकाबंदी करण्यात आली. इनोव्हा कार थांबताच तीन आरोपी व चालकाशेजारील एक जण पळून गेले. मात्र, चालक अरबाज खान फिरोज खान (२३, रा. खदान, हैदरपुरा, अकोला) याला अटक करण्यात आली.
कारची तपासणी केली असता काळ्या रंगाचा चोरी केलेला बैल, शस्त्रसाठा व दरोड्याचे साहित्य आढळून आले. झटापटीदरम्यान निरीक्षक संदीप पाटील यांना किरकोळ दुखापत झाली. अकोला येथील जुने शहर पोलिस स्टेशनमध्ये पंचनामा करून सर्व साहित्य जप्त करण्यात आले.
चौकशीतून सैय्यद फिरोज उर्फ अनडूल, अफजल सैय्यद, इम्रान, तन्नू उर्फ तन्वीर, अफरोज खान उर्फ अण्प्या ही आरोपींची नावे निष्पन्न झाली असून, ते सध्या फरार आहेत.
ही कारवाई पोउपनिरीक्षक अनिल जाधव, पोहेकॉ दर्शन ढाकणे, रवी नरवाडे, सुनील दामोदरे, विजय पाटील, अक्रम शेख, श्रीकृष्ण देशमुख, भरत पाटील व अकोला पोलीस दलाच्या मदतीने यशस्वीरित्या पार पाडण्यात आली. पोलीस अधीक्षक रेड्डी यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे.