खान्देशगुन्हेजळगांवराजकीयशासकीयसामाजिक

बेटावद मॉब लिंचिंग प्रकरणात ‘मकोका’ लावण्याची मागणी

बेटावद मॉब लिंचिंग प्रकरणात ‘मकोका’ लावण्याची मागणी

 

जामनेर: तालुक्यातील बेटावद खुर्द येथे झालेल्या मॉब लिंचिंग प्रकरणाला सहा दिवस उलटले असून, या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार अद्यापही मोकाट फिरत असल्याचा आरोप जळगाव जिल्हा एकता संघटनेने केला आहे. या प्रकरणात ‘मकोका’ (Maharashtra Control of Organised Crime Act) लावावा आणि तपासी अधिकारी बदलण्यात यावा, या प्रमुख मागण्यांसाठी संघटनेने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जळगावात भेट घेऊन निवेदन दिले आहे.

मुख्य आरोपी अद्यापही फरार

या घटनेतील काही आरोपींना अटक करण्यात आली असली, तरी मुख्य सूत्रधार अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. हा आरोपी एका संघटनेशी संबंधित असून, तो स्थानिक राजकीय नेत्याच्या जवळचा असल्याची माहिती आहे. घटनास्थळी उपस्थित साक्षीदार, पोलिसांकडे उपलब्ध असलेले पुरावे आणि पीडित कुटुंबाच्या तक्रारी असूनही मुख्य आरोपीला आणि कॅफे चालकाला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

अजित पवारांकडे मागण्यांचे निवेदन

जळगाव जिल्हा एकता संघटनेने उपमुख्यमंत्र्यांकडे केलेल्या मागण्यांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:

  • एसआयटीमधून पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांना काढून त्यांच्या जागी डीवायएसपी दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करावी.
  • मुख्य सूत्रधाराला तातडीने अटक करावी.
  • गुन्ह्यात भारतीय दंड संहिता कलम ६१(२) आणि ‘मकोका’ लागू करावा.
  • पीडित कुटुंबाला संरक्षण आणि न्याय मिळवून द्यावा.
  • पीडित कुटुंबाला २५ लाख रुपयांची आर्थिक मदत आणि सरकारी नोकरी द्यावी.
  • या प्रकरणाचा खटला वेगाने चालवण्यासाठी विशेष सरकारी वकिलाची नेमणूक करावी.

या घटनेमुळे अल्पसंख्याक समाजात भीती व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असून, शासनाने तातडीने कारवाई करून न्यायव्यवस्थेवरील विश्वास पुन्हा निर्माण करावा, अशी मागणीही संघटनेने केली.

उपमुख्यमंत्र्यांचे कारवाईचे आश्वासन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फारूक शेख यांच्याशी गंभीर चर्चा केली. त्यांनी जळगावच्या पोलीस अधीक्षकांशी या प्रकरणावर बोलण्याचे आणि राज्याचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनाही या तक्रारीची माहिती देण्याचे आश्वासन दिले. ही घटना महाराष्ट्राला काळिमा फासणारी असल्याचे त्यांनी नमूद केले.

या शिष्टमंडळात मुफ्ती खालिद, फारूक शेख, नदीम मलिक, फिरोज शेख, कासिम उमर, जावेद मुल्ला, आसिफ शेख, शाहबाज खान, शकील शेख, हाफिज रहीम पटेल, मौलाना कासिम नदवी, मौलाना गुफरान, मतीन पटेल, अनवर शिकलगर, ॲड. आवेश शेख, नजमुद्दीन शेख, साबिर खान, शब्बीर खान, अमजद पिंजारी, शेख फिरोज यांच्यासह धुळे, नंदुरबार आणि जळगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button