
महावितरणच्या विद्युत सुरक्षा अभियानाचा जागतिक सन्मान
इंग्लंडच्या ‘वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स’ पुरस्काराने गौरव
जळगाव, दि. २९ ऑगस्ट : महावितरणच्या शून्य विद्युत अपघात जनजागृती अभियानाला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली असून इंग्लंडस्थित ‘वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स’ संस्थेकडून या अभियानाचा सन्मान करण्यात आला आहे. विक्रमी लोकसहभागाची नोंद घेत या अभियानाला आंतरराष्ट्रीय दर्जाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या उपक्रमाचे मार्गदर्शक आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र तसेच प्रभावी अंमलबजावणीसाठी संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांना प्रमाणपत्राने गौरविण्यात आले. मुंबईत आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार महावितरणच्या वतीने संचालक (मानव संसाधन) श्री. पवार आणि विशेष कार्य अधिकारी मंगेश कोहाट यांनी स्वीकारला. यावेळी लंडनचे मानसशास्त्रज्ञ डॉ. दिवाकर सुकुल, अमेरिकेतील शास्त्रज्ञ डॉ. मधू कृष्णन, तसेच ज्येष्ठ संपादक व माजी मंत्री राजेंद्र दर्डा उपस्थित होते.
‘वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स’ संस्थेच्या निवड समितीने या अभियानाचे कौतुक केले. अध्यक्ष हेनरी आर (युरोप), प्रमुख पाब्लो (इंग्लंड), उपाध्यक्ष संजय पंजवानी, परीक्षक चंद्रशेखर शिंदे आदी मान्यवरांचा त्यात समावेश होता.
महावितरणच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त दि. १ ते ६ जूनदरम्यान राज्यभर राबविण्यात आलेल्या या जनजागृती मोहिमेत तब्बल २ लाख ११ हजारांहून अधिक नागरिक, विद्यार्थी, अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले. तसेच १ कोटी ९२ लाख ७९ हजार ग्राहकांना एसएमएसद्वारे तर ३५ लाख ७३ हजार ग्राहकांना ई-मेलद्वारे विद्युत सुरक्षेचा संदेश पोहोचविण्यात आला.
याआधीच या अभियानाला एशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड संस्थांकडून पाच विक्रमांसाठी मान्यता मिळाली होती. आता या उपक्रमाला जागतिक स्तरावर शिक्कामोर्तब झाल्याने महावितरणचा गौरव अधिक वृद्धिंगत झाला आहे.





