
जळगाव जिल्ह्यातील 10 वी, 12 वी मध्ये यश मिळालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव
विद्या ही केवळ गुणांपुरती मर्यादित नको; ती विचारात आणि कृतीत उतरवा– पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव, प्रतिनिधी: माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
जिल्हा परिषदेतर्फे आयोजित या गौरव समारंभात पालकमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “उंच भरारी घ्या, पण पाय जमिनीवर ठेवा. यशाच्या शिखरावर पोहोचताना नम्रता हीच खरी साथ देणारी असते. WhatsAppवर वेळ दवडू नका, ‘What’s next’ याचा विचार करा. विद्या ही केवळ गुणांपुरती मर्यादित न ठेवता ती विचारात, कृतीत आणि वागण्यात उतरवली पाहिजे.”
या कार्यक्रमाला आमदार अमोल पाटील, आमदार अमोल जावळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, शिक्षणाधिकारी, विविध शाळांचे प्राचार्य, शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुणवंत विद्यार्थ्यांना महात्मा गांधींची मूर्ती, सुताचा हार व अभिनंदनपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
*गुणवंतांचा गौरव*
दहावी परीक्षेतील गुणवंतांमध्ये महाराष्ट्र मंडळातून प्रसन्न हिम्मत चौधरी (100%), जेनिशा गेही (99.60%), वेदिका क्षत्रिय (99.40%), रोहन संदीप पाटील (99.00%), पूर्व पाटील व चैताली पाटील (98.80%) यांचा समावेश आहे.
बारावी परीक्षेत विज्ञान शाखेत अदिती सोनार (92.67%), कला शाखेत अख्तर बेग मिझ (91.33%), वाणिज्य शाखेत अभिषेक जैन (97.33%) हे विद्यार्थ्यांनी आघाडी घेतली. सीबीएसई बोर्डातून मानसी वायकोळे (99.40%), तनिष्का अग्रवाल (98.80%) यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केले.
आदिवासी गटातील गंगावती वळवी (90.40%), अनुसूचित जाती-जमातीतील पियुष जाधव (79.20%), तसेच अनाथाश्रमातील वैशाली हिवराळे व दामिनी महाजन या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांशी संवाद
पालकमंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना “पुढे काय होणार?” असा प्रश्न विचारला असता, बहुतेकांनी डॉक्टर, इंजिनीयर होण्याची इच्छा व्यक्त केली. काही विद्यार्थ्यांनी भारतीय प्रशासन सेवेत जाण्याचा संकल्प बोलून दाखवला. मात्र, राजकीय क्षेत्रात येण्याची तयारी फार कमी असल्याचे दिसून आले. त्यावर पालकमंत्र्यांनी सांगितले, “राजकारणात हुशार तरुणांची गरज आहे. तुम्ही पुढे आलात, तर समाज बदलू शकतो.” त्यावर एका विद्यार्थ्याने राजकारणात येण्याची उत्सुकता व्यक्त केली.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी विद्यार्थ्यांना बोलतं केलं. त्यावेळी विद्यार्थ्यांनी दहावीनंतर पालकांचा ओढा कॉलेजपेक्षा क्लासेसकडे अधिक असतो, याकडे लक्ष वेधून हा कल थांबवण्याची गरज व्यक्त केली. पालकमंत्र्यांनीही या मुद्द्यावर चिंता व्यक्त करत शासन स्तरावर यासंदर्भात चिंतन सुरू असल्याचे सांगितले.
गौरव समारंभाचा उद्देश
विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करून त्यांच्या आत्मविश्वासात वाढ होणे व पुढील वाटचालीसाठी प्रेरणा मिळणे, हा जिल्हा परिषदेमार्फत आयोजिलेल्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. समारंभाच्या समाप्तीनंतर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
—