
जळगाव जिल्ह्यातील १०२ रुग्णवाहिका चालकांचा दिवाळीचा आनंद हरवला
वेतन रखडल्याने कुटुंबांसमोर आर्थिक अडचणी ; चालकांचा उद्रेक
जळगाव प्रतिनिधी | दिवाळी – प्रकाशाचा आणि आनंदाचा सण. पण जळगाव जिल्ह्यातील तब्बल १०२ रुग्णवाहिका चालकांसाठी यंदाची दिवाळी काळोखात गेली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांचे वेतन रखडल्याने त्यांच्या कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळले आहे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत कार्यरत असलेले हे चालक रात्रंदिवस रुग्णसेवेत तत्पर, मात्र स्वतःच्या घरात दिवे लावण्यासाठी पैसा नाही, अशी शोकांत परिस्थिती निर्माण झाली आहे.
हे सर्व चालक जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा रुग्णालये आणि जिल्हा रुग्णालयातील रुग्णवाहिका सेवेवर कार्यरत आहेत. अपघातग्रस्त, प्रसूतीनंतरची रुग्ण, आपत्कालीन स्थितीतले रुग्ण यांना वेळेवर वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी हे चालक जीव धोक्यात घालतात. तरीही त्यांना महिनोंमहिने पगार मिळत नसल्याने त्यांच्या संसाराची घडी विस्कटली आहे.
चालकांनी अलीकडेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनावाल यांची भेट घेऊन आपल्या वेतनाबाबत निवेदन दिले होते. त्यावेळी प्रशासनाने “लवकरच वेतन दिले जाईल” असे आश्वासन दिले होते. मात्र, अनेक आठवडे उलटूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने चालकांमध्ये नाराजी आणि असंतोष वाढत आहे.
जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी श्री. येवले यांनी सांगितले की, “सध्या चालकांच्या खात्यांचा डेटा अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर वेतन दिले जाईल.” मात्र, या प्रक्रियेला आणखी किती वेळ लागणार याबाबत त्यांनी स्पष्टता दिली नाही.
दरम्यान, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अनेक चालकांच्या घरात ना फराळ, ना कपडे, ना उत्सवाची चाहूल. काहींनी तर उधार घेऊन संसार चालवण्याची वेळ आल्याचे सांगितले. एका चालकाने संताप व्यक्त करत म्हटले, “रुग्णासाठी आम्ही जीव धोक्यात घालतो, पण आमच्या घरातील दिवे विझले तरी कोणालाच फरक पडत नाही.”
या गंभीर प्रश्नाकडे लोकप्रतिनिधींनी आणि आरोग्य विभागाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी चालकांकडून होत आहे. कारण हा प्रश्न फक्त वेतनाचा नसून त्यांच्या कुटुंबांच्या जगण्याचा आणि सन्मानाचा आहे. प्रशासनाने तत्काळ ठोस निर्णय घेतल्यासच या कुटुंबांच्या दिवाळीत पुन्हा प्रकाश पडेल.





