जळगांवशासकीय

चाळीसगावचे माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराने निधन!

चाळीसगावचे माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराने निधन!

वयाच्या ५६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; राजकीय वर्तुळात शोककळा

चाळीसगाव प्रतिनिधी:

चाळीसगाव मतदारसंघाचे माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे निष्ठावान नेते राजीव देशमुख (वय ५६) यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने चाळीसगाव तालुक्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देशमुख यांना आज  पहाटे ४ वाजेच्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीने शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारांसाठी धुळे येथील रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र उपचारादरम्यान सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

राजीव देशमुख हे गेल्या काही दिवसांपासून अल्पशा आजाराने त्रस्त होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच चाळीसगाव तालुका आणि परिसरात शोककळा पसरली.

संघटनप्रिय नेता व कार्यतत्पर आमदार:

राजीव देशमुख यांनी आमदार म्हणून आपल्या कार्यकाळात उल्लेखनीय कामगिरी केली. स्थानिक विकासकामांवर त्यांचा नेहमीच भर राहिला. शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर ते पुढाकार घेत असत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेला ग्रामीण भागात मजबूत करण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले.

नगरसेवक ते आमदार असा राजकीय प्रवास:

२००१: स्वर्गीय अनिल देशमुख यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत वयाच्या ३२ व्या वर्षी त्यांनी बिनविरोध नगरसेवकपदाची निवडणूक जिंकून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली.

२००१ (सार्वत्रिक निवडणूक): त्यांनी वार्ड क्र. ९ मधून पुन्हा विजय मिळवला. याच निवडणुकीत त्यांच्या पत्नी सौ. पद्मजा राजीव देशमुख या लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या.

२००९: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) कडून उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवत आमदार म्हणून विधानसभेत प्रवेश केला.

आज अंत्यसंस्कार:

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव आज संध्याकाळी चाळीसगाव येथे अंत्यसंस्कारासाठी आणले जाणार असल्याची माहिती नातेवाईकांकडून देण्यात आली आहे. त्यांच्या निवासस्थानी विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांनी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मोठी गर्दी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button