चोरट्यांकडून चोरी गेलेले ३३ मोबाईल शोधून नागरिकांना परत

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील आठवडे बाजारात चोरीस गेलेले मोबाईल फोन जळगाव एमआयडीसी पोलिसांनी शोधून मूळ मालकांच्या ताब्यात दिले आहेत. काही दिवसांपूर्वी एमआयडीसी पोलिसांनी चोरट्यांकडून एकूण ३३ मोबाईल हस्तगत केले होते. पोलिसांनी या मोबाईलचे मूळ मालक शोधून त्यांच्याशी संपर्क साधून मोबाईल पोलीस स्टेशनमध्ये परत केले.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
सदर तपासात पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश शिरसाळे, पोलीस नाईक प्रदीप चौधरी व पोलीस कॉन्स्टेबल निलेश पाटील यांनी महत्वाची भूमिका बजावली.
पोलिसांच्या या कार्यामुळे नागरिकांत समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, मोबाईल चोरी प्रकरणांवर नियंत्रण मिळविण्यात पोलीस यंत्रणेला यश मिळाले आहे.
