
बसस्थानक परिसरात महिला प्रवाशाची ६० हजारांची सोनसाखळी लंपास
जळगाव प्रतिनिधी शहरातील नवीन बसस्थानक परिसरात एका महिला प्रवाशाला चोरट्यांनी लक्ष्य करत ६० हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. हा प्रकार २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडला असून, याप्रकरणी अखेर २८ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामनेर येथील कल्पना सुनील लखोटे (वय ५९, रा. माळी गल्ली, जामनेर) या काही कामानिमित्त जळगाव शहरात आल्या होत्या. काम आटोपल्यानंतर त्या जामनेरला परतण्यासाठी नवीन बसस्थानकावर पोहोचल्या. दरम्यान, गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी तोडून पोबारा केला. साखळीची किंमत सुमारे ६० हजार रुपये इतकी असल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेमुळे बसस्थानक परिसरातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.




