जळगावमध्ये अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यावरील कार्यशाळा उत्साहात संपन्न

जळगावमध्ये अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यावरील कार्यशाळा उत्साहात संपन्न
जनजागृती, अंमलबजावणीसाठी शासकीय यंत्रणांचा सहभाग
जळगाव, दि. १ ऑगस्ट – अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम, 1989 व त्यामधील सुधारणा, 2016 अंतर्गत कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि जनजागृतीसाठी जिल्ह्यात एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन सभागृहात संपन्न झाली.
कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते झाले. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जात पडताळणी समितीच्या अध्यक्षा नयना बोदर्डे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, जिल्हा शासकीय अभियोक्ता सुरेंद्र काबरा, सहायक आयुक्त नंदा रायते, शासकीय निवासी शाळांचे विशेष अधिकारी राजेंद्र कांबळे, यशदा पुण्याचे प्रशिक्षक सुभाष केकाण आणि बार्टीचे प्रकल्प अधिकारी सचिन गिरमे हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सहायक आयुक्त नंदा रायते यांनी प्रास्ताविकातून कायद्याच्या अंमलबजावणीचे महत्त्व अधोरेखित केले. उद्घाटनपर भाषणात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सामाजिक सुधारणा घडविण्यासाठी कायद्याचा प्रभावी वापर गरजेचा असल्याचे सांगितले. पोलिस प्रशासनाच्या भूमिका, अडचणी व उपाययोजना यावर डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेत महसूल, पोलीस व ग्रामविकास विभागातील विविध अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला. कायद्यातील महत्त्वाच्या कलमांची माहिती, तपास प्रक्रियेतील अडथळे, न्यायालयीन प्रक्रिया तसेच पीडितांना मिळणारी मदत याविषयी जिल्हा शासकीय अभियोक्ता सुरेंद्र काबरा व प्रशिक्षक सुभाष केकाण यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बार्टीचे तालुका समन्वयक अनिल पगारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन राजेंद्र कांबळे यांनी केले. या कार्यशाळेमुळे कायद्याविषयी अधिकाऱ्यांमध्ये जाणिवा निर्माण झाल्या असून सामाजिक समतेच्या दिशेने सकारात्मक पाऊल उचलण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहाय्यक आयुक्त कार्यालय व बार्टीच्या समन्वयकांनी विशेष मेहनत घेतली.





