
वाळू वाहतुकीसाठी मागितली लाच ; तीन आरोपी रंगेहात अटकेत
भुसावळ प्रतिनिधी | भुसावळ तालुक्यात वाळू वाहतुकीसाठी लाच मागणारा रॅकेट एसीबीच्या कारवाईत उघडकीस आला. भुसावळ तहसील कार्यालयासमोर खाजगी पंटर शिवदास लटकन कोळी (वय ५९), वराडसीम तलाठी नितीन पंडितराव केले (४६) आणि कोतवाल जयराज रघुनाथ भालेराव (४९) यांना सोमवारी दुपारी रंगेहात अटक करण्यात आली.
अटकेनंतर आरोपींना मंगळवारी भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर केले असता, दोन्ही दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
तलाठी केले यांच्या बॅगेत ₹१,६५,००० रोकड आढळली,खाजगी पंटर कोळी याच्याकडे ₹७३,००० लाच आणि अतिरिक्त ₹८६,००० रोकड जप्त झाली. एसीबीच्या तपासानुसार खाजगी पंटर कोळीने कबुली दिली की, ही ₹८६,००० रक्कम जळगावातील वाळू वाहतूकदाराकडून वसूल केली गेली आहे. मात्र त्याने सोबत असलेल्या इतर रकमेबाबत कोणतीही माहिती दिली नाही.
भुसावळ तालुक्यातील तक्रारदाराच्या वाळू वाहतुकीसाठी खाजगी पंटर कोळीने तहसिलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्यासाठी दर महिन्याला ₹७३,००० लाच मागावी लागेल असे संभाषण केले होते. यानंतर तक्रारदाराने हे प्रकरण जळगाव एसीबीकडे नोंदवले. पडताळणी नंतर भुसावळ तहसील कार्यालयासमोर सापळा रचून आरोपी पंटरानंतर तलाठी व कोतवालालाही अटक करण्यात आली.
ही कारवाई भ्रष्टाचाराविरुद्ध पोलिसांची ठोस धडक असून, महसूल विभागातील लाच रॅकेट उघडकीस आणण्यात यश मिळाले आहे.





