
गतिमान प्रशासनातून दिव्यांग लाभार्थ्याला तत्काळ शिधापत्रिका वाटप
जळगाव प्रतिनिधी l जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्ह्यात “गतिमान प्रशासन” उपक्रमाअंतर्गत प्राप्त विनंती/तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करून लाभार्थ्यांपर्यंत सेवा पोहोचविण्याचे काम प्रभावीपणे सुरू आहे.
याच उपक्रमांतर्गत यावल तालुक्यातील दिव्यांग व्यक्ती फरूकि नाईमुद्दिन कालिमुद्दिन यांनी अन्नसुरक्षा योजनेंतर्गत धान्याचा लाभ मिळावा, यासाठी तहसील कार्यालयात अर्ज केला होता. दरम्यान, जिल्हा मुख्यालयात कामानिमित्त आले असता त्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेऊन आपल्या समस्येची माहिती दिली.
या विनंतीची तात्काळ दखल घेत जिल्हाधिकारी यांनी जिल्हा पुरवठा शाखेला त्वरीत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार, जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. रुपेश विजय बिजेवार व जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहायक स्वप्निल येवले यांनी यावल येथील पुरवठा शाखेशी त्वरीत संपर्क साधून तात्काळ कार्यवाही केली. सदर लाभार्थ्यास जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ई-शिधापत्रिका वितरित करण्यात आली.
या प्रसंगी जिल्हाधिकारी यांनी सर्व शिधापत्रिकाधारक नागरिकांना नाववाढ, नावकमी व नवीन शिधापत्रिका मिळविण्यासाठी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या https://rcms.mahafood.gov.in/PublicLogin/frmPublicLogin.aspx या लिंकचा वापर करून public login मधून अर्ज करण्याचे आवाहन केले.
—