
दोन गावठी पिस्तूल आणि सहा जिवंत काडतुसांसह दोन तरुणांना अटक
अमळनेर पोलिसांची कारवाई
अमळनेर: अमळनेर ते चोपडा रस्त्यावर पोलिसांनी गुरुवारी (२८ ऑगस्ट) रात्री साडेदहाच्या सुमारास धडक कारवाई करत दोन तरुणांकडून दोन गावठी पिस्तूल आणि सहा जिवंत काडतुसे जप्त केले आहेत. या कारवाईत दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
अमळनेर पोलीस स्टेशनचे निरीक्षक दत्तात्रय निकम यांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी चोपडा रस्त्यावर, आसाराम बापू आश्रमाजवळ सापळा रचला. त्यानुसार विशाल भैय्या सोनवणे (वय १८, रा. ढेकुसिम, ता. अमळनेर) आणि गोपाल भीमा भिल (वय ३०, रा. सत्रासेन, ता. चोपडा) यांना ताब्यात घेतले.
अंगझडतीत त्यांच्याकडून कोणताही परवाना नसतानाही दोन गावठी पिस्तूल आणि सहा जिवंत काडतुसे आढळले. पोलिसांनी या कारवाईत एकूण १ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींना शुक्रवारी मध्यरात्री ३ वाजता अटक करण्यात आली.
ही कारवाई पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, पुढील तपास उपनिरीक्षक नामदेव बोरकर करत आहेत.





