
जुन्या वादातून तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला !
रामेश्वर कॉलनीतील घटना
जळगाव (प्रतिनिधी) – जुन्या वादातून झालेल्या हल्ल्यात हर्षल उर्फ बब्या कुणाल पाटील (वय १८, रा. एकनाथ नगर, रामेश्वर कॉलनी) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. रविवारी सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास रामेश्वर कॉलनीतील राज शाळेसमोर ही धक्कादायक घटना घडली. सध्या हर्षलवर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हर्षल पाटील हा बारावीचा विद्यार्थी असून दुपारी तो आपल्या मित्रासोबत राज शाळेच्या परिसरात मोबाईल खेळत बसला होता. यावेळी दुचाकीवरून आलेल्या तीन जणांनी त्याच्यावर धारदार कोयता आणि चॉपरसारख्या शस्त्रांनी हल्ला केला. हल्लेखोरांनी डोक्यावर, कपाळावर आणि मानेवर वार केल्याने हर्षल गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्याचा मित्र नितीन देशमुख हा पळून जाऊन बचावला. घटनेनंतर मित्रांनी तत्काळ रिक्षातून हर्षलला जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
हल्ल्याची संपूर्ण घटना राज शाळेच्या प्रवेशद्वारावरील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पोलिसांनी फुटेज ताब्यात घेऊन हल्लेखोरांचा शोध सुरू केला असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
दरम्यान, गंभीर अवस्थेत मुलाला पाहताच हर्षलच्या आईने आक्रोश केला आणि त्यांना भोवळ आली. रुग्णालयात त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत. घटनेनंतर रुग्णालयात मोठ्या संख्येने नातेवाईक व मित्रमंडळी जमल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणी पोलिस तपास सुरू असून हल्लेखोरांना लवकरच अटक होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.





