
हॉटेल मालकाच्या त्रासाला कंटाळून हॉटेल चालकाची आत्महत्या
जळगाव: भाड्याने घेतलेल्या हॉटेलसाठी मोठा खर्च केल्यानंतर मालकाने जागा खाली करण्यासाठी वारंवार त्रास दिल्याने एका हॉटेल चालकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आशिष मधुकर फिरके (वय ४८) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे, त्यांनी आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट लिहून ती व्हॉट्सअॅप स्टेटसवर ठेवली होती. ही घटना रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मूळचे यावल तालुक्यातील सांगवी येथील असलेले आशिष फिरके, सध्या संत निवृत्ती नगरात राहत होते. त्यांनी रिंगरोडवरील रामसहाय शर्मा यांच्या मालकीचे ‘रौनक’ हॉटेल तीन वर्षांच्या करारावर (agreement) भाड्याने घेतले होते. त्यांनी हॉटेलच्या नूतनीकरणासाठी बराच खर्च केला होता. मात्र, अचानक रामसहाय शर्मा यांनी हॉटेलची जागा खाली करण्यासाठी फिरके यांना वारंवार त्रास देण्यास सुरुवात केली. शर्मा यांचा मुलगा रजनील रामसहाय शर्मा यानेही त्यांना अनेकदा धमक्या दिल्या, असे फिरके यांनी सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे.
या सततच्या त्रासाला कंटाळून आशिष फिरके यांनी हॉटेलमध्येच गळफास घेऊन आपले जीवन संपवले.
सुसाईड नोटमधील मजकूर:
आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये आशिष फिरके यांनी म्हटले आहे की, “माझ्या आत्महत्येला फक्त आणि फक्त हॉटेल रौनकचे मालक रामसहाय शर्मा जबाबदार आहेत. त्यांनी मला तीन वर्षांचे अॅग्रीमेंट करून दिले होते आणि नंतर ‘टेन्शन घेऊ नकोस, मी पुन्हा तीन वर्षांचा करार करून देईन,’ असे सांगितले होते. त्यांनी सांगितल्यानुसार मी हॉटेलवर बराच खर्च केला. पण, अचानक त्यांनी जागा खाली करण्यासाठी त्रास द्यायला सुरुवात केली. मी त्यांना माझ्या दोन लहान मुलांचा विचार करण्याची विनंती केली, पण त्यांनी ‘मला काही घेणेदेणे नाही,’ असे म्हटले. त्यांच्या आणि त्यांच्या मुलाच्या (रजनील रामसहाय शर्मा) सततच्या धमक्या आणि त्रासामुळेच मी हे टोकाचे पाऊल उचलत आहे.”
आशिष फिरके यांनी लिहिलेली सुसाईड नोट व्हॉट्सअॅपवर स्टेटस म्हणून ठेवल्यानंतर ही घटना समोर आली. माहिती मिळताच जिल्हापेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि फिरके यांना तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी सुसाईड नोट ताब्यात घेतली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.




