
सुरतचा अट्टल गुन्हेगार साहिल पठाणच्या भुसावळात आवळल्या मुसक्या !
एलसीबीच्या पथकाची कामगिरी
प्रतिनिधी | जळगाव I गुजरात राज्यातील सुरत येथील अट्टल गुन्हेगाराच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या असून तो तापी व्यारा येथील सेशन कोर्टातील जबरी चोरीच्या गंभीर गुन्ह्यात फरार असलेला साहील उर्फ सलीम पठान (वय २१, रा. भाटीया गाव, हाजीपुरा, सचिन, जि. सुरत) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले.
१९ सप्टेंबर रोजी सकाळी ११.१५ वाजता नहाटा चौफुलीजवळील हायवेवर ही कारवाई करण्यात आली. निझर पोलीस स्टेशन, सुरत (गुजरात) येथून मिळालेल्या खात्रीशीर माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी स्थागुशा पथकाला निर्देश दिले होते. त्यानुसार आरोपीला गजाआड करण्यात आले.
सदर आरोपीवर आधीच अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असून त्यामध्ये जबरी चोरी, घरफोडी, चोरी आणि आर्म अॅक्टचे प्रकरणे आहेत. उमरा, सचिन, माहीरापुरा, पुना, कडोदरा आणि नवसारी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे एकूण आठ गुन्हे त्याच्याविरुद्ध दाखल आहेत.
आरोपी साहील पठान याला वैद्यकीय तपासणीनंतर पुढील कारवाईसाठी निझर पोलीस स्टेशन (गुजरात) येथील सफौ/ए. बी. पटेल यांच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोउपनिरिक्षक शरद बागल, श्रे. पोउनि. रवि नरवाडे, पोहेकॉ गोपाल गव्हाळे, पोहेकॉ उमाकांत पाटील, पोना विकास सातदिवे, पोकॉ प्रशांत परदेशी आणि पोकॉ राहुल वानखेडे यांनी ही धडाकेबाज कारवाई केली.





