
पाळधी येथील आगग्रस्त दुकानदारांना तात्काळ मदत द्या अन्यथा 26 जानेवारी पासून आमरण उपोषण
जळगाव प्रतिनिधी :- धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे 31 डिसेंबरच्या रात्री मुस्लिम समाजाची 21 दुकानांची लूट करण्यात येऊन आग लावण्यात आली होती. या आगीत दुकानदाराच्या कुटुंबीयांचे उपजीविकेचे साधन असलेले दुकान आणि साहित्य आगीच्या भक्षस्थानी पडल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. पंचनामा केल्यानंतरही दहा दिवसानंतर कोणतेही कारवाई करण्यात आलेली नसून या आगग्रस्त 21 दुकानदारांचे कुटुंबीय हे जिल्हाधिकारी कार्यालय समोर 26 जानेवारी पासून बेमुदत उपोषण करतील असा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान मंत्री गिरीश महाजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अतिरिक्त सचिव यांना पाळधी येथील नुकसानग्रस्त दुकानदारांना भरपाई मिळवून देण्याबाबत निवेदन देण्यात आले आहे.
जिल्ह्यात चार मंत्री असताना सुद्धा एकाही मंत्र्यांनी आग्रस्त दुकानदारांची विचारपूस केली नाही. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन,पाळधी येथील रहिवासी असलेले गुलाबराव पाटील यांच्याकडूनही काही सहानुभूती मिळाली नाही. तसेच केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्याकडूनही मदत मिळालेली नाही. यावेळी निवेदन देताना नुकसानग्रस्त दुकानदार हमीद मनियार, जावेद पिंजारी, तन्वीर शहा, यासीर देशमुख, तसवर शेख, फारुख शरीफ, एजाज देशमुख, नदीम मलिक, एकता संघटनेचे हाफिज अब्दुल रहीम, अनिस शहा, अमजद पठाण, मतीन पटेल, अन्वर खान, इमरान शेख, सय्यद फैयाज, सय्यद इरफान अली आदी उपस्थित होते.