
तडीपारी’ म्हणजे गुन्हेगारांवर पोलिसांचा कायदेशीर वचक !
महाराष्ट्र पोलीस कायद्यातील कलम ५५, ५६ आणि ५७ नेमके काय सांगतात?
जळगाव : जिल्ह्यात सुरू असलेल्या तडीपार कारवाईच्या पार्श्वभूमीवर ‘तडीपारी’ म्हणजे नेमके काय, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार समाजात दहशत, भीती किंवा गुन्हेगारी वातावरण निर्माण करणाऱ्या व्यक्तींना ठराविक काळासाठी जिल्हा किंवा परिसरातून बाहेर काढण्याची प्रक्रिया म्हणजे तडीपारी होय. याचा उद्देश शिक्षा देणे नसून सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे हा असतो.
टोळ्यांवर कारवाईसाठी कलम ५५
महाराष्ट्र पोलीस कायद्यातील कलम ५५ हे विशेषतः टोळी किंवा गँगवर कारवाई करण्यासाठी वापरले जाते. एखादी टोळी खंडणी, धमक्या किंवा संघटित गुन्हे करत असल्यास पोलिसांना त्या टोळीतील सदस्यांना वेगवेगळ्या भागात तडीपार करण्याचा अधिकार असतो. यामुळे टोळीची एकजूट मोडून गुन्हेगारीवर आळा बसवण्याचा प्रयत्न केला जातो. या कारवाईचे अधिकार पोलीस अधीक्षकांकडे असतात.
‘कट्टर’ गुन्हेगारांसाठी कलम ५६
कलम ५६ हे सातत्याने गुन्हे करणाऱ्या आणि समाजात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या धोकादायक व्यक्तींवर लागू केले जाते. अनेकदा अशा गुन्हेगारांच्या भीतीमुळे साक्षीदार पुढे येत नाहीत. अशावेळी पोलिस प्रशासन संबंधित व्यक्तीला जिल्ह्याबाहेर तडीपार करू शकते. या आदेशाचे अधिकार उपविभागीय दंडाधिकारी (SDM) यांच्याकडे असतात.
शिक्षा झालेल्या गुन्हेगारांवर कलम ५७
जेलमधून सुटल्यानंतर पुन्हा गंभीर गुन्हे करण्याची शक्यता असलेल्या
रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कलम ५७ अंतर्गत कारवाई केली जाते. विशेषतः शरीराविरुद्ध किंवा मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या आरोपींवर या कलमान्वये लक्ष ठेवले जाते.
तडीपारीचा उद्देश ‘सुरक्षित समाज’
तडीपारी ही केवळ पोलिसी कारवाई नसून सामाजिक सुरक्षिततेसाठीचा प्रतिबंधात्मक उपाय मानला जातो. गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांसोबत समाजाचीही जबाबदारी महत्त्वाची असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.





