खान्देशगुन्हेजळगांव

जळगावात अवैध धंद्यांवर पोलिसांचा धडक प्रहार

गावठी दारू व मटका अड्ड्यांवर एकाच दिवशी पाच छापे; ८ आरोपी जेरबंद, रोकड व दारूसाठा जप्त

जळगावात अवैध धंद्यांवर पोलिसांचा धडक प्रहार

गावठी दारू व मटका अड्ड्यांवर एकाच दिवशी पाच छापे; ८ आरोपी जेरबंद, रोकड व दारूसाठा जप्त

जळगाव, प्रतिनिधी : जळगाव शहर व एमआयडीसी परिसरातील अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी मोठी मोहीम राबवत एकाच दिवशी पाच ठिकाणी धडक छापेमारी केली. जळगाव भागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक प्रशांत दरेकर यांच्या विशेष पथकाने ९ जून रोजी केलेल्या या कारवाईत गावठी हातभट्टी दारू विक्री आणि मटका जुगार चालवणाऱ्या ८ आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींकडून रोकड, दारूसाठा आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.

आर.एल. चौफुली परिसरात दारू विक्रेत्यावर कारवाई

एमआयडीसी हद्दीतील आर.एल. चौफुलीजवळील सर्व्हिस रोड परिसरात पोलिसांनी छापा टाकून विशाल पुनमचंद राठोड (वय २०, रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव) याला अवैध गावठी हातभट्टी दारू विक्री करताना रंगेहात पकडले. त्याच्याकडून ३० लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. दारूचा नमुना तपासणीसाठी पाठवून उर्वरित साठा जागीच नष्ट करण्यात आला.

पेट्रोल पंपाजवळील मटका अड्ड्यावर धाड

पुष्पा पेट्रोल पंपाजवळील सर्व्हिस रोड परिसरात ‘टाईम बाजार’ नावाचा मटका सट्टा चालवणाऱ्या हनिस सैय्यद नवाज (वय ५१, रा. बळीराम पेठ) आणि रवींद्र गंभीर पाटील (वय ५६, रा. मोहाडी फाईल) यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून रोकड, सट्ट्याच्या पावत्या आणि साहित्य जप्त करण्यात आले.

आणखी तीन मटका बुकी ताब्यात

आर.एल. चौफुली परिसरातच दुसऱ्या ठिकाणी टाईम बाजार मटका चालवणारे मदानानंद प्रल्हाद शिंदे (वय ३४), शुभम दीपक जाधव (वय २७) आणि कैलास शांताराम खेळवण (वय ४७) यांना पोलिसांनी पकडले. त्यांच्या ताब्यातून सट्टा साहित्य आणि रोकड जप्त करण्यात आली.

गावठी दारू विक्री करणारा दुसरा आरोपीही जाळ्यात

पुष्पा पेट्रोल पंप परिसरातच सुरेश भीमराव सपकाळे (वय ५५, रा. रामेश्वर कॉलनी, मेहरूण) याला ३० लिटर गावठी हातभट्टी दारूसह ताब्यात घेण्यात आले. जप्त केलेली दारू नष्ट करण्यात आली असून त्याच्याविरुद्धही दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेल्वे गेट परिसरातून दोघे सट्टेबाज अटकेत

जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बॉम्बे रेल्वे गेटसमोरील पुलाखाली ‘मिलन डे ओपन’ नावाचा सट्टा जुगार चालवणारे घनश्याम राजाराम पाटील (वय ४१) आणि मुकेश भिका मराठे (वय ४४, दोघे रा. खंडेराव नगर) यांना पोलिसांनी रंगेहात पकडले. त्यांच्या ताब्यातून रोकड आणि सट्टा जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.

एकूण ८ आरोपींविरुद्ध गुन्हे

या मोहिमेत पोलिसांनी एकूण ८ आरोपींना अटक करून सुमारे २० हजार रुपयांहून अधिक रोकड, गावठी दारू आणि जुगाराचे साहित्य जप्त केले. दारू प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम तर मटका प्रकरणी महाराष्ट्र जुगारबंदी अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

विशेष पथकाची यशस्वी कारवाई

ही कारवाई परिविक्षाधीन डीवायएसपी प्रशांत दरेकर, पोलीस कर्मचारी आवेश शेख, सचिन साळुंखे, अमोल ठाकूर, किरण वानखेडे, तुषार पाटील तसेच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे संजीव मोरे, रामदास कुंभार आणि अमोल पाटील यांच्या संयुक्त पथकाने केली. या धडक मोहिमेमुळे शहरातील अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून पोलिसांच्या पुढील कारवायांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button