खान्देशगुन्हेजळगांव

विमा रकमेच्या हव्यासापोटी अपघाताचा बनाव; पोलीस, डॉक्टरांसह १० जणांवर गुन्हा

मृत्यू अपघाती दाखवून ५० लाखांचा क्लेम; बनावट साक्षीदार आणि खोट्या गुन्ह्याचा आधार घेत १० लाखांची फसवणूक केल्याचा आरोप

विमा रकमेच्या हव्यासापोटी अपघाताचा बनाव; पोलीस, डॉक्टरांसह १० जणांवर गुन्हा

मृत्यू अपघाती दाखवून ५० लाखांचा क्लेम; बनावट साक्षीदार आणि खोट्या गुन्ह्याचा आधार घेत १० लाखांची फसवणूक केल्याचा आरोप

जळगाव I खानदेश टाइम्स न्यूज : विमा कंपनीकडून मोठी रक्कम मिळविण्यासाठी मृत्यू अपघातात झाल्याचा बनाव रचून बनावट साक्षीदार उभे करणे, अपघाताची खोटी माहिती देणे आणि त्याआधारे गुन्हा दाखल करण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या कथित विमा फसवणूक प्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, आरोपींमध्ये खासगी व्यक्तींसह पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी आणि विमा एजंटचा समावेश असल्याने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पोलिसांच्या नोंदीनुसार, या प्रकरणातील कथित घटनाक्रम ९ जून २०२५ रोजी रात्री ११.४८ वाजेपासून सुरू झाल्याचे नमूद आहे. चाळीसगाव तालुक्यातील जामदा शिवार हे या प्रकरणातील घटनास्थळ दाखविण्यात आले आहे. याप्रकरणी १९ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६.२८ वाजता मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तक्रारीनुसार, संबंधित आरोपींनी संगनमत करून मृत्यू रस्ते अपघातात झाल्याचे भासविण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. यासाठी बनावट साक्षीदार तयार करण्यात आले. तसेच अपघाताबाबत खोटी माहिती देऊन त्याआधारे गुन्हा दाखल करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या संपूर्ण प्रकारामागे विमा कंपनीकडून मोठी आर्थिक रक्कम मिळविण्याचा उद्देश असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणात सुरुवातीला विमा कंपनीकडे ५० लाख रुपयांचा विमा दावा दाखल करण्यात आला होता. मात्र, प्रकरणाचा तपास सुरू असताना आरोपी क्रमांक चार यांनी हा दावा मागे घेतल्याची माहिती पोलीस नोंदीत आहे. त्यानंतर मृत व्यक्तीच्या नावावर असलेल्या विमा कंपनीच्या डेबिट कार्डचा वापर करून १० लाख रुपये काढून घेतल्याचा आणि विमा कंपनीची फसवणूक केल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणात नितेश हिम्मत पाटील (रा. एरंडोल), आकाश सुनील पाटील (रा. जुवाडा, ता. भडगाव), प्रेमचंद त्र्यंबक पाटील (रा. एरंडोल), कविता संजय पाटील (रा. एरंडोल, जि. जळगाव), तपासी अंमलदार पोलीस उपनिरीक्षक रविंद्र एकनाथ बत्तासे, वैद्यकीय अधिकारी डॉ. मंदार करबेकर, विमा एजंट प्रवीण मयाराम पाटील (रा. पारोळा), पोलीस कर्मचारी महेंद्र प्रकाश पाटील, पोलीस कर्मचारी सचिन अशोक निकम आणि सुनील अशोक निकम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१८(४), ६१(२) तसेच पोलीस नोंदीतील अन्य लागू कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, विमा दाव्याच्या नावाखाली रचण्यात आलेल्या कथित बनावामागील संपूर्ण साखळी आणि आर्थिक व्यवहारांची माहिती तपासातून समोर येण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button