
मेहरूण तलावाजवळ गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद; कट्टा विकणारा मुख्य सूत्रधारही पोलिसांच्या जाळ्यात
एमआयडीसी पोलिसांचा अॅक्शन मोड; दोघांवर गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी): शहरातील मेहरूण तलाव परिसरातील सुबोनिया पक्षीघराजवळ बेकायदेशीररित्या विनापरवाना गावठी कट्टा बाळगून दहशत माजविणाऱ्या एका तरुणासह त्याला कट्ट्याची विक्री करणाऱ्या मुख्य सूत्रधाराच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. २४ जून रोजी सायंकाळच्या सुमारास करण्यात आलेल्या या धडक कारवाईमुळे जळगावातील अवैध शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
कमरेला कट्टा लावून फिरताना आवळल्या मुसक्या
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तांबापुरा परिसरातील बिलाल चौकात राहणारा समीर खान जावेद खान (वय २५) हा तरुण मेहरूण तलाव परिसरातील सुबोनिया पक्षीघराजवळ कमरेला गावठी कट्टा लावून फिरत असल्याची आणि परिसरात दहशत माजवत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला मिळाली होती. माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके आणि त्यांच्या पथकाने तात्काळ मेहरूण तलाव परिसरात धाव घेत सापळा रचला आणि संशयित समीर खान याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे विनापरवाना गावठी कट्टा मिळून आला.
खाकीचा इंगा दाखवताच ओकले नाव; मुख्य सूत्रधार गजाआड
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार गणेश ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन्ही आरोपींविरुद्ध आर्म्स ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेल्या समीर खान याला पोलिसांनी खाकी वर्दीचा इंगा दाखवत कसून चौकशी केली असता, त्याने हा कट्टा मेहरूणमधील दत्तनगर भागात राहणाऱ्या जावेद शेख सलीम शेख याच्याकडून खरेदी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी वेळ न गमावता तात्काळ सूत्रे हलवून संशयित विक्रेता जावेद शेख यालाही दत्तनगर परिसरातून बेड्या ठोकल्या. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार (सफौ) विजयसिंग पाटील करत आहेत.
या पोलीस पथकाने गाजवली कामगिरी:
जिल्ह्यात अवैध शस्त्रांचे कंबरडे मोडण्यासाठी जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी विशेष सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे शोध पथकातील सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील, पोलीस अंमलदार गणेश ठाकरे, किरण चौधरी, नितीन ठाकूर, किरण पाटील, राहुल घेटे, रमाकांत साळुंखे, शशिकांत मराठे आणि योगेश घुगे या सर्व कर्मचाऱ्यांनी अत्यंत धाडसी कामगिरी करत या दोन्ही आरोपींना जेरबंद केले.





